गोवा

महिला सुरक्षा, बेरोजगारीसह विविध मुद्द्यांवरून अलका लांबा यांची सरकारवर टीका

पणजी : गोव्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेले भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरले असून, आता जनतेला कारणे नव्हे तर ठोस परिणाम आणि प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, अशी टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी बुधवारी केली.


पणजी येथील काँग्रेस हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत लांबा यांनी बेरोजगारी, महिलांविरोधातील गुन्हे, कथित नोकरी घोटाळा, अमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी, जमिनींचे बेकायदा रूपांतर, पर्यटन आणि पर्यावरणाच्या प्रश्नांवरून भाजप सरकारवर निशाणा साधला.


“आम्हाला तुमची ‘मन की बात’ नको. आम्हाला दहा प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. बहाणे नकोत, परिणाम हवेत,” असे लांबा म्हणाल्या.


महिलांच्या सुरक्षेवरून सरकारला सवाल

गेल्या चार वर्षांत गोव्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांची ९२२ प्रकरणे नोंदली गेल्याचा दावा लांबा यांनी केला. यामध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

“भाजपच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची गोव्यातील हीच खरी वस्तुस्थिती आहे. आज गोव्यात एखादी महिला निर्भयपणे फिरू शकते का?” असा सवाल त्यांनी केला.

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना भाजपच्या महिला नेत्यांनीही सरकारला याबाबत प्रश्न विचारावेत, असे आवाहन त्यांनी केले.


‘नोकऱ्या विकल्या जात आहेत’

सरकारी नोकऱ्यांसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करत लांबा यांनी सरकारवर टीका केली. “हे नोकऱ्या विकणारे सरकार आहे. भाजपच्याच मंत्र्यांनी त्यांच्या सरकारवर नोकरी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. पात्र गोमंतकीय तरुणांना डावलून सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना नोकऱ्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. या सरकारने गोव्यातील तरुणांचे भविष्य धोक्यात आणले आहे,” असे त्या म्हणाल्या.


अमली पदार्थांवरून गंभीर आरोप

गोव्याची ओळख शांतता आणि संस्कृतीसाठी होती; मात्र भाजपच्या सत्ताकाळात राज्यात अमली पदार्थ आणि गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप लांबा यांनी केला.

“अमली पदार्थांच्या प्रकरणांत दोषींना शिक्षा कुठे आहे? प्रसिद्धीसाठी अमली पदार्थ पकडले जातात आणि त्यानंतर तस्करांना संरक्षण दिले जाते. सरकार आणि ड्रग माफिया यांच्यात संगनमत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

CAG अहवालाचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचेही आरोप केले. “हे सरकार जनतेच्या पैशांची लूट करणारे सरकार आहे,” अशी टीका त्यांनी केली.


‘गोव्याचा आत्मा लुटला जाऊ देऊ नका’

जमिनींचे कथित बेकायदा रूपांतर आणि पर्यावरणाच्या प्रश्नावरूनही लांबा यांनी सरकारला लक्ष्य केले. “ही जमीन-चोर, व्होट-चोर, चंदा-चोर आणि पेपर-चोर सरकार आहे. सरकारला वेळीच थांबवले नाही तर गोव्याचा आत्मासुद्धा लुटला जाईल. पर्यावरणाचा विध्वंस थांबवून गोव्याचा वारसा वाचवण्याची वेळ आली आहे,” असे त्या म्हणाल्या.

भाजप सरकारच्या काळात पर्यटन क्षेत्राचीही स्थिती खालावल्याचा आरोप त्यांनी केला. “दहा वर्षांत महागाई, गुन्हेगारी आणि बेरोजगारी याशिवाय गोमंतकीयांच्या पदरात काय पडले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


प्रज्वल रेवण्णा प्रकरणाचा संदर्भ

प्रज्वल रेवण्णा प्रकरणाचा संदर्भ देत लांबा यांनी भाजपवर महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला.

“भाजपच्या डबल इंजिनमध्ये बलात्काराच्या आरोपींना शिक्षा होत नाही, तर त्यांना पॅरोल मिळतो. गोव्यात आपण ‘प्रज्वल रेवण्णा पार्ट-२’ पाहिले आहे. भाजप नेत्याच्या मुलावर आरोप असतानाही तो आरोपी मोकाट फिरत आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने रेवण्णाला तुरुंगात पाठवले. हाच काँग्रेस आणि भाजपमधील फरक आहे,” असे त्या म्हणाल्या.


‘काँग्रेस सूडाच्या राजकारणाला घाबरणार नाही’

भाजपच्या कथित सूडाच्या राजकारणाला काँग्रेस घाबरणार नसल्याचेही लांबा यांनी स्पष्ट केले. ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा संदर्भ देत त्यांनी त्याचे स्वागत केले.

“राहुल गांधी लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत. भाजपच्या महिला नेत्यांनी आपल्या नेतृत्वाला विचारावे की ९२२ महिलांवर अत्याचार झाले तेव्हा तुम्ही काय केले?” असा सवाल त्यांनी केला.

गोव्याला गुन्हेगारी आणि अमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत “या अपयशी डबल इंजिन सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे,” असे लांबा यांनी सांगितले.


या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप, सरचिटणीस अॅड. शबनम खान तसेच अन्य राष्ट्रीय महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!