
प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चर यांचे निधन
लंडन : जगभरात आपल्या वेगवान कथानकांसाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटिश लेखक आणि माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकाशक हार्परकॉलिन्सने सोमवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. विशेष म्हणजे, त्यांची अंतिम कादंबरी ‘अॅडम अँड ईव्ह’ प्रकाशित होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांचा मृत्यू झाला.
आर्चर यांचे निधन अचानक आणि शांतपणे झाले. मृत्यूपूर्वीच्या काळातही ते लेखन आणि पुस्तकांच्या प्रचारात सक्रिय होते. निधनाच्या आदल्या दिवशी लंडनमधील लेस्टर स्क्वेअर थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी चाहत्यांना पुस्तकांवर स्वाक्षऱ्याही करून दिल्या होत्या.
‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ आणि १९७९ मध्ये प्रकाशित झालेली ‘केन अँड एबल’ यांसारख्या कादंबऱ्यांमुळे आर्चर जगभरात लोकप्रिय झाले. त्यांच्या पुस्तकांच्या तब्बल ३० कोटींहून अधिक प्रती जगभर विकल्या गेल्याचे प्रकाशकांनी सांगितले आहे.
राजकारणातून साहित्याकडे
जेफ्री आर्चर यांचा जन्म १५ एप्रिल १९४० रोजी लंडनमध्ये झाला. १९६९ मध्ये वयाच्या २९व्या वर्षी ते कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार म्हणून ब्रिटनच्या संसदेत दाखल झाले. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांना काही वर्षांतच राजकारणापासून दूर व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी लेखनाकडे पूर्णपणे वळण्याचा निर्णय घेतला.
१९८०च्या दशकात ते पुन्हा राजकीय वर्तुळात प्रभावी ठरले. तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या काळात त्यांची कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली.
मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का एका न्यायालयीन प्रकरणामुळे बसला. १९८७ मध्ये एका वृत्तपत्राविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात आर्चर यांनी मोठी नुकसानभरपाई मिळवली होती. मात्र पुढे या प्रकरणात खोटी साक्ष आणि न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याच्या आरोपांवरून त्यांना दोषी ठरवण्यात आले. २००१ मध्ये त्यांना चार वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांनी सुमारे दोन वर्षे तुरुंगवास भोगला. या अनुभवावर आधारित त्यांनी ‘अ प्रिझन डायरी’ ही पुस्तकमालिका लिहिली.
भारतीय वाचकांमध्येही प्रचंड लोकप्रिय
जेफ्री आर्चर यांच्या साहित्याला भारतात विशेष लोकप्रियता मिळाली. विशेषतः ‘केन अँड एबल’ ही कादंबरी भारतीय वाचकांच्या अनेक पिढ्यांसाठी आर्चर यांच्या साहित्याची ओळख ठरली. ते अनेकदा भारतात पुस्तकांच्या प्रकाशनासाठी आणि वाचकांशी संवाद साधण्यासाठी येत असत. त्यांच्या पुस्तकांच्या भारतातील लोकप्रियतेचा उल्लेख त्यांनी स्वतःही अनेकदा केला होता.
भारताविषयीच्या त्यांच्या आत्मीयतेचा प्रभाव त्यांच्या लेखनातही दिसून आला. ‘कॉमेथ द अवर’ या कादंबरीतील काही भाग मुंबईत घडतो. तसेच त्यांच्या कथासंग्रहात दिल्लीतील एका जोडप्याच्या प्रेमकथेचाही समावेश आहे.
‘अॅडम अँड ईव्ह’ ठरली अखेरची कादंबरी
आर्चर यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा अखेरचा टप्पा ‘अॅडम अँड ईव्ह’ या कादंबरीने गाठला. या कादंबरीचे लेखन सुरू करतानाच ती आपली शेवटची कादंबरी असेल, असे त्यांनी प्रकाशकांना सांगितले होते.
सुमारे पाच दशकांच्या लेखनप्रवासात त्यांनी अनेक लोकप्रिय कादंबऱ्या, कथासंग्रह आणि आत्मचरित्रात्मक लेखन केले. ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ आणि ‘विल्यम वॉर्विक’ या मालिकांनाही मोठी लोकप्रियता मिळाली.
२०२४ मध्ये त्यांनी हाऊस ऑफ लॉर्ड्समधून निवृत्ती घेतली. मात्र लेखन त्यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले. त्यांच्या निधनाने जागतिक साहित्यविश्वातील अत्यंत लोकप्रिय कथाकारांपैकी एक लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे.






