
‘अंबानी हे भारताचे खरे बॉस आहेत का?’; स्टारलिंकच्या विलंबावरून एलॉन मस्क यांचा सवाल
नवी दिल्ली : भारतात ‘स्टारलिंक’ची व्यावसायिक सेवा सुरू करण्यास होत असलेल्या विलंबावरून स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. काही ‘ओलिगार्क’ अर्थात अतिश्रीमंत व्यावसायिक हितसंबंधी स्टारलिंकला भारतात प्रवेश मिळू नये यासाठी अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप केल्यानंतर मस्क यांनी आता थेट रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
‘स्टारलिंकला १६५ हून अधिक देशांमध्ये परवाना मिळाला आहे. भारत सरकारच्या प्रत्येक कायद्याचे आणि नियमांचे गेली पाच वर्षे पालन करूनही भारतात परवानगी मिळण्यास विलंब का होत आहे? अंबानी हे भारताचे खरे बॉस आहेत का?’ असा सवाल मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून केला.
मस्क यांनी बुधवारीही भारतातील काही ‘ओलिगार्क’ स्टारलिंकचा प्रवेश रोखत असल्याचा आरोप केला होता. आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी स्टारलिंकला अडवले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. स्टारलिंक भारतातील इंटरनेटची सुविधा नसलेल्या किंवा अत्यल्प असलेल्या भागांना वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.
सरकारकडून आरोप फेटाळले
मस्क यांच्या आरोपांना केंद्र सरकारने उत्तर दिले असून, उपग्रहाधारित इंटरनेट सेवांच्या परवानगी प्रक्रियेत कोणताही भेदभाव केला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. दूरसंचार मंत्रालयाने ही प्रक्रिया निष्पक्ष आणि भेदभावमुक्त असल्याचे सांगितले. उपग्रह दूरसंचार सेवा देण्यासाठी परवाना मिळालेल्या तीन कंपन्यांच्या सुरक्षा तपासण्या सध्या सुरू असून, त्या सर्व कंपन्या नियामक प्रक्रियेच्या जवळपास समान टप्प्यावर असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यामुळे प्रक्रिया अन्यायकारक किंवा भेदभावपूर्ण असल्याचा आरोप निराधार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनीही स्टारलिंकसह सर्व उपग्रह दूरसंचार कंपन्यांचे परवाने देण्यात आले असून, सध्या सुरक्षा मंजुरीचा मुद्दा गृह मंत्रालयाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. त्याचा एका कंपनीशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिओ, एअरटेलही उपग्रह इंटरनेटच्या शर्यतीत
भारतात उपग्रहाधारित इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या शर्यतीत स्टारलिंकसोबत रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलशी संबंधित कंपन्याही आहेत. जिओ उपग्रह इंटरनेटसाठी स्वतंत्र लो-अर्थ ऑर्बिट उपग्रहांचे जाळे उभारण्याच्या तयारीत आहे. भारती समूहाशी संबंधित Eutelsat OneWeb देखील या क्षेत्रात कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील उपग्रह इंटरनेट बाजारपेठेत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
स्टारलिंकने भारतात व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी २०२२ मध्ये परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर दूरसंचार विभागाकडून आवश्यक परवाना तसेच भारतीय अंतराळ नियामक संस्थेकडून आवश्यक मंजुरी मिळाली आहे. मात्र सुरक्षा तपासणी आणि स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यावसायिक सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मस्क यांच्या आरोपांमुळे स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, व्यावसायिक स्पर्धा, राष्ट्रीय सुरक्षा आणि उपग्रह इंटरनेटच्या नियमनाचा प्रश्न यामुळे या वादाला आता अधिक व्यापक स्वरूप आले आहे.



