देश/जग

सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा राहुल गांधींसह विरोधकांना भेटण्यास नकार

नवी दिल्ली : कथित मतचोरी आणि मतदार याद्यांतील अनियमिततांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिला आहे. मात्र, या निर्णयानंतरही INDIA आघाडीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया थांबवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.


लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी INDIA आघाडीतील घटक पक्षांसह अन्य विरोधी पक्ष, सामाजिक संस्था आणि तरुणांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबत सरन्यायाधीशांना निवेदन देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.



न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्याचा सल्ला

राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे सोमवारी सायंकाळी भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी ई-मेलद्वारे भेट घेण्यास असमर्थता दर्शवली. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर प्रशासकीय पातळीवर चर्चा करण्याऐवजी न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करावा, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

प्रशासकीय अधिकारांचा वापर करून न्यायालयाला सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करता येणार नाही, असेही सरन्यायाधीशांनी नमूद केल्याचे सांगण्यात आले. संबंधित मुद्द्यांवर काँग्रेसने याचिका दाखल केल्यास त्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सुनावणी घेता येईल, असेही त्यांनी सुचवले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी खुले आहेत. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी, प्रत्येकाला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. कायद्यानुसार योग्य तो दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट केले.


मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावरून वाद

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे.

तसेच, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) पुन्हा मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही विरोधकांकडून केली जाणार आहे.


मोर्चासाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त

दरम्यान, सरन्यायाधीशांनी भेट नाकारली असली, तरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर INDIA आघाडी ठाम आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीशांच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे सांगितले. निवेदन सादर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर मार्गांचा विचार केला जाईल; मात्र मोर्चा काढण्याचा निर्णय कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मध्य दिल्लीतील काही मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि निर्गमन मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले असून, अनेक रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!