
डिसेंबरमध्ये गोव्यात रंगणार ‘टीव्हीएस मोटोसोल ६.०’
मोटरसायकलिंग, स्टंट, रेसिंग, कस्टम बाइक्स आणि संगीताचा अनुभव
बेंगळुरू : मोटरसायकलप्रेमींसाठी लोकप्रिय असलेल्या ‘टीव्हीएस मोटोसोल’ महोत्सवाची सहावी आवृत्ती ११ आणि १२ डिसेंबर २०२६ रोजी गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने ‘मोटोसोल ६.०’ची घोषणा केली असून, यंदाच्या महोत्सवात मोटरस्पोर्ट्स, कस्टम मोटरसायकल्स, रायडिंगचे विविध अनुभव, संगीत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम यांचा समावेश असेल.
टीव्हीएस मोटोसोल हे मोटरसायकलिंगच्या पलीकडे जाऊन रायडर्सची जीवनशैली, सर्जनशीलता आणि समुदाय यांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे. या महोत्सवात रायडर्स, रेसर्स, मोटरसायकल डिझाइनर्स, कलाकार आणि मोटरसायकलप्रेमी सहभागी होणार आहेत.
स्टंट, ऑफ-रोडिंग आणि रेसिंगचा थरार
महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये स्टंट बॅटल्स, मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅक, जिमखाना, हिल क्लाइंब चॅलेंज, ड्रिफ्ट-आर चॅम्पियनशिप आणि सँड रश चॅलेंज यांचा समावेश आहे. रायडर्सना विविध मोटरसायकल्सची चाचणी घेण्याची संधीही मिळणार आहे.
रेसिंग आणि मोटरसायकलिंगविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कार्यशाळा, तंत्रज्ञानविषयक चर्चा, रायडर मास्टरक्लास आणि टीव्हीएस रेसिंगमधील अनुभवी रायडर्सशी संवाद असे कार्यक्रम आयोजित केले जातील.
कस्टम बाइक्सचे प्रदर्शन
कस्टम मोटरसायकल्स हे मोटोसोलचे आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. मोटरसायकलच्या मूळ रचनेत बदल करून तिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व देणाऱ्या डिझाइनचे प्रदर्शन या महोत्सवात केले जाते.
टीव्हीएस अपाचे आणि टीव्हीएस रोनिनच्या विविध कस्टम आवृत्त्या यापूर्वी महोत्सवात सादर करण्यात आल्या आहेत. यंदाही कस्टम बाइक्सचे प्रदर्शन, नवीन डिझाइनचे अनावरण, हेल्मेट पेंटिंग कार्यशाळा आणि मोटरसायकल कस्टमायझेशनशी संबंधित उपक्रमांची अपेक्षा आहे.
संगीत, मनोरंजन आणि रायडर्सचा सहभाग
मोटरसायकलिंगबरोबरच संगीत आणि मनोरंजनालाही महोत्सवात महत्त्व दिले जाणार आहे. लाइव्ह संगीत, आंतरराष्ट्रीय डीजे, कलाकारांचे सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे या कार्यक्रमाला महोत्सवाचे स्वरूप मिळणार आहे.
टीव्हीएस अपाचे ओनर्स ग्रुप (एओजी) आणि टीव्हीएस रोनिनच्या ‘कल्ट’ रायडर समुदायासाठी विशेष उपक्रम, कम्युनिटी राइड्स, रायडर्सच्या अनुभवकथा आणि क्रिएटर्सशी संवाद असे कार्यक्रमही आयोजित केले जातील.
सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर
महोत्सवात मोटरसायकल चालविताना सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक आयोजन, शाश्वततेशी संबंधित उपक्रम आणि जबाबदार मोटरसायकलिंगचा संदेश देण्यावरही भर असेल.
टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रीमियम बिझनेसचे प्रमुख विमल सुंबली यांनी सांगितले की, मोटोसोल हे मोटरसायकलिंगमधील परफॉर्मन्स, तंत्रज्ञान, साहसी अनुभव, डिझाइन आणि संस्कृती यांना एकत्र आणणारे व्यासपीठ बनले आहे. सहाव्या आवृत्तीत या अनुभवाचा विस्तार करून रायडर्सना परस्परांशी जोडण्याचा आणि मोटरसायकलिंगच्या विविध पैलूंचा आनंद घेण्याचा प्रयत्न असेल.
टीव्हीएस मोटर कंपनीच्या माहितीनुसार, जगभरात टीव्हीएस अपाचे आणि रोनिनचे ७० लाखांहून अधिक रायडर्स आहेत. या रायडर समुदायाच्या सहभागातून मोटोसोलसारख्या उपक्रमांना बळ मिळत आहे.
११ आणि १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘मोटोसोल ६.०’मध्ये नवीन उत्पादनांचे अनावरण किंवा विशेष सादरीकरणे होणार का, याबाबत कंपनीने तपशीलवार माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, मोटरसायकलिंग, तंत्रज्ञान, कस्टमायझेशन, साहसी खेळ आणि मनोरंजन यांचा एकत्रित अनुभव देण्यावर यंदाच्या आवृत्तीचा भर असेल.






