गोव्याच्या महसूल विभागात ‘कॉमन केडर’ची स्थापना
गट ‘क’ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीचा मार्ग होणार सुकर
पणजी : गोवा सरकारने महसूल विभागाच्या सचिवालयाबाहेरील कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या गट ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी सामायिक संवर्ग अर्थात ‘कॉमन केडर’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हाधिकारी कार्यालयांसह भूमापन व भूमिअभिलेख संचालनालयातील कर्मचाऱ्यांचा या संवर्गात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या आणि पदोन्नतीसाठी एकसमान ज्येष्ठता यादी तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या सामायिक संवर्गात अव्वल कारकून, मंडळ निरीक्षक, तलाठी, मुख्य लिपिक, वरिष्ठ व कनिष्ठ लघुलेखक, पर्यवेक्षक, मुख्य भूमापक, क्षेत्रीय भूमापक, अनुरेखक श्रेणी एक व दोन, उच्च व निम्न श्रेणी लिपिक, कर्मचारी नोंदपाल, वाहनचालक, बेलिफ आणि बहुकार्य कर्मचारी (एमटीएस) यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सरकारकडून अधिसूचित करण्यात येणाऱ्या अन्य गट ‘क’ पदांचाही या संवर्गात समावेश केला जाणार आहे.
सध्या महसूल विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये समान स्वरूपाची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापना आणि ज्येष्ठता याद्या आहेत. त्यामुळे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली करताना ज्येष्ठतेशी संबंधित अडचणी निर्माण होत होत्या. सामायिक संवर्गामुळे या अडचणी दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
नव्या व्यवस्थेनुसार संबंधित पदांवरील कर्मचाऱ्यांची एकत्रित ज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे. या यादीच्या आधारे नियुक्ती, बदली आणि पदोन्नतीचे नियमन संबंधित सेवा भरती नियमांनुसार केले जाईल. राजपत्रात या निर्णयाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम करणे, उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करणे आणि कर्मचाऱ्यांना समान सेवाविषयक संधी उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे. विशेषतः गोव्यात नव्याने स्थापन झालेल्या कुशावती जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.




