देश/जग

सोनिया-राहुल यांची मनधरणी निष्फळ; स्टॅलिन मतदारसंघ फेररचना विधेयकाच्या समर्थनावर ठाम!

चेन्नई : मतदारसंघ फेररचना विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले असताना, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चेन्नईत जाऊन द्रमुकचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतरही स्टॅलिन यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. ‘भावनेच्या भरात निर्णय घेणार नाही. सध्याच्या परिस्थितीत विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेत्यांनी स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रस्तावित मतदारसंघ फेररचना विधेयकाला विरोध करण्याची विनंती केली. या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी आपली भूमिका मांडली; तर स्टॅलिन यांनी द्रमुकच्या खासदारांच्या बैठकीत मंजूर झालेला ठराव आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मात्र, या चर्चेनंतर द्रमुकच्या भूमिकेत बदल झाल्याचे संकेत मिळाले नाहीत.

तमिळनाडूच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा

१९७१ च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची फेररचना झाल्यास तमिळनाडूच्या लोकसभेतील सध्याच्या ३९ जागा कमी होऊन ३१ किंवा ३२ होण्याची शक्यता द्रमुकने यापूर्वी व्यक्त केली होती. त्यामुळे संसदेतील राज्याचा प्रतिनिधित्वाचा वाटाही घटू शकतो, अशी पक्षाची चिंता होती. याचा परिणाम केवळ तमिळनाडूवर नव्हे, तर दक्षिणेकडील अन्य राज्यांवरही होऊ शकतो, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

मात्र, केंद्राच्या सुधारित प्रस्तावानुसार सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याची तरतूद असल्याने द्रमुकने आपली भूमिका बदलली आहे. पक्षाच्या दाव्यानुसार, या व्यवस्थेमुळे तमिळनाडूच्या लोकसभेतील जागा ३९ वरून ५९ पर्यंत वाढू शकतात. तसेच संसदेतील राज्याचा सध्याचा प्रतिनिधित्वाचा वाटा कायम राखण्यास मदत होईल.

‘विधेयक फेटाळल्यास सध्याचे संरक्षणही गमावू’

प्रस्तावित विधेयकाचा पराभव झाल्यास तमिळनाडूला सध्या उपलब्ध असलेले किमान संरक्षणही गमवावे लागू शकते, अशी भीती स्टॅलिन यांनी व्यक्त केली. या प्रस्तावामुळे पुढील २५ वर्षे, म्हणजे २०५१ पर्यंत, राज्याच्या लोकसभेतील जागा कमी होणार नाहीत, असा द्रमुकचा दावा आहे. राज्याचा प्रतिनिधित्वातील वाटा ७.२३ टक्क्यांपर्यंत सुरक्षित राहू शकतो, असे पक्षाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात नमूद केले आहे.

‘आमच्यासाठी तमिळनाडू सर्वप्रथम आहे. राज्याचे हित लक्षात घेऊनच आम्ही निर्णय घेतला आहे,’ अशी भूमिका स्टॅलिन यांनी मांडली. काँग्रेस नेत्यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले असले तरी विधेयकाबाबत द्रमुकच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘इंडिया’ आघाडीत मतभेद उघड

मतदारसंघ फेररचना विधेयकाला विरोध करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी एकत्रित भूमिका घेण्याचा प्रयत्न केला असताना द्रमुकने विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने विरोधकांसमोरील आव्हान वाढले आहे.

लोकसभेतील २२ आणि राज्यसभेतील आठ खासदारांचे संख्याबळ असलेल्या द्रमुकची भूमिका विधेयकाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतरही स्टॅलिन यांनी घेतलेली भूमिका कायम राहिल्याने मतदारसंघ फेररचनेचा मुद्दा संसदेतील चर्चेत अधिक महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!