गोव्यात खनिज लिलाव करण्यासंदर्भात राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. या ऑगस्ट महिन्या अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील लिलाव सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे. तसंच टप्प्याटप्प्याने उरलेल्या लिलावाची प्रक्रियाही सरकारकडून पूर्ण केली जाणार आहे.
यासोबतच खाण क्षेत्रात गोवा मागे राहणार नाही. सरकार 4 ते 6 महिन्यांत खाणकाम पुन्हा सुरू करेल आशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी केली आहे. पुढील 4-6 महिन्यांत लिलावाच्या मार्गाने सरकार राज्यातील खाण उपक्रम पुन्हा सुरू करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लवकरच गोव्यात खाण उद्योग पुन्हा सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. खाण लिलाव येत्या 4 महिन्यात पूर्ण झाला तर 5 महिन्यात खाणी पुन्हा सुरु करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र या खाणींच्या लिलावादरम्यान एका मालकाला 10 किमी पेक्षा जास्तीचा परिसर घेता येणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
खनिज लिलावात स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देण्याची मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारकडे केली होती. खाण अवलंबितांनी नुकतीच गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली होती. यावेळी खाणप्रश्नी आवाज उठवणार असल्याचं ग्वाही सरदेसाईंनी अवलंबितांना दिली होती. विधानसभेत सरदेसाईंनी खाणप्रश्नी सरकारला थेट सवाल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खाणी सुरु करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु असून येत्या 5 ते 6 महिन्यात खाणी सुरु करणार असल्याची माहिती दिली.