‘राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या दोषींवर गुन्हे दाखल करा’
मडगाव :
जमीन बळकावण्याच्या प्रकरणात राजकारण्यांचा सहभाग असेल तर भाजप सरकारने त्याचा राजकीय फायद्यासाठी दबावतंत्र म्हणून वापर करु नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर प्रकरणांत सहभाग असलेल्या दोषींवर ताबडतोब कारवाई करावी आणि जमीन बळकाव प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.
गोव्यातील कथित जमीन हडप प्रकरणांमध्ये राजकारण्यांच्या सहभागाबाबत पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी ठेवलेले गूढ हे भाजप सरकारच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारे आहे. सदर जमीन बळकाव प्रकरणात कोणत्याही राजकारण्याचा सहभाग असल्यास पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
भाजपच्या राजकीय फायद्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी यांच्यावर निवडक पद्धतीने कारवाई करण्याचे सत्र सध्या चालू आहे. या एकंदर प्रकरणात पोलीसांनी सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या दबावाखाली न येता मुक्त आणि निष्पक्ष तपास करावा. जे दोषी असतील त्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाऊ नये, असा पुनरुच्चार युरी आलेमाव यांनी केला.
गोव्यात आता उघडकीस आलेली जमीन बळकाव प्रकरणे ही भाजप सरकारचे गेल्या दहा वर्षातील प्रशासकीय अपयश आहे. सरकारच्या बेपर्वाईने राज्यात हेराफेरी आणि कागदपत्रांची बनावटगिरी वाढली आहे. आता समोर आलेल्या प्रकरणांवरून भाजप सरकार दहा वर्षांत गाढ झोपेत होते व प्रशासनावर त्यांचा कसलाच वचक नव्हता हे स्पष्ट झाले आहे असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
जमीन बळकाव प्रकरणाचा तपास करणार्या पोलिस अधिकार्यांनी तपासात पूर्ण पारदर्शकता राखली पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे हे महत्त्वाचे आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवरच कारवाई होऊ द्या. पोलिसांनी निष्पाप राजकारण्यांना किंवा सर्वसामान्यांना लक्ष्य करू नये, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले आहे.