संपदा कुंकळकार यांना अ.ना. म्हांब्रो पुरस्कार
धि गोवा हिंदू असोशिएशनच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा
पणजी :
धि गोवा हिंदू असोशिएशन या मुंबईस्थित गोमंतकीय संस्थेच्यावतीने देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आली. यामध्ये सातत्यपूर्ण लिखाणासाठीचा अ.ना. म्हांब्रो पुरस्कार गोमंतकीय कोंकणी युवा लेखिका संपदा कुंकळकार यांना जाहीर झाला आहे. 15 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे संस्थेच्यावतीने कळवण्यात आले आहे.
कोंकणीमध्ये अध्यात्म, वैचारिक, चिंतनगर्भ आणि मनोविश्लेषणात्मक विषयांवर संपदा कुंकळकार या सातत्याने लिखाण करत आहेत. या विषयांवर त्यांची आजवर 13 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून, विविध दैनिके तसेच मासिकांमध्येदेखील त्या विविध विषयांवर स्तंभ लिहित असतात. त्यांच्या ‘चार पावला आशियांत’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला दोन वर्षांपूर्वी केंद्रीय साहित्य अकादेमीचा युवा साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यासोबत गोवा राज्य युवा सृजन पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत.
‘धि गोवा हिंदू असोशिएशन ही देशात नावाजली जाणारी साहित्य-सांस्कृतिक संस्था आहे. त्यामुळे अशा संस्थेने आपली नोंद घेणे आणि त्यांच्या परिक्षक मंडळाच्यावतीने ‘अ.ना. म्हांब्रो’ पुरस्कारासाठी आपली निवड होणे हा माझ्यासाठी खूप आनंदाची आणि त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट आहे. मला कल्पना आहे की, या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारीमध्ये वाढच झाली आहे. आणि येणार्या काळातील माझे लिखाण हे त्या जबाबदारीनुरुपच होईल याची मला काळजी घेतली पाहिजे.’ अशा शब्दांत संपदा कुंकळकार यांनी या पुरस्कारासंदर्भात आपली प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली.
दरम्यान, मुंबई येथे होणार्या धि गोवा हिंदू असो, च्या वार्षिक वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.