द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आज (११ सप्टेंबर ) निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांनी आज दुपारी साडेतीन वाजता मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथील परमहंसी गंगा आश्रमात अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. स्वामी स्वरूपानंद यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी दीर्घ कायदेशीर लढा दिला होता. स्वातंत्र्यलढ्यात ते तुरुंगातही गेले होते.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव धनपती उपाध्याय आणि आईचे नाव गिरिजा देवी होते. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले. स्वामी स्वरूपानंद यांनी वयाच्या नवव्या वर्षी घर सोडले आणि धार्मिक यात्रा सुरू केली. या दरम्यान ते काशीला पोहोचले जेथे त्यांनी स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद आणि धर्मग्रंथाची शिक्षा घेतली.