‘ …तरच होऊ शकेल गावांचा सर्वसमावेशक विकास’
कुंकळ्ळी :
खेड्यांचा विकास आराखडा तयार करण्यात ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग सदर गावांची सकारात्मक प्रगती सुनिश्चित करू शकतो. समाजसेवा ही मानवतेची सेवा आहे, असे प्रतिपादन कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केले.
डॉन बॉस्को कॉलेज, पणजीच्या समाजकार्य विभागातर्फे कुंकळ्ळीच्या आंबावली गावातील आकामोळ येथे आयोजित ग्रामीण शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. फादर कार्लिस्टो कुएल्हो तसेच डॉन बॉस्को कॉलेज पणजीचे शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
आज बेरोजगारीचा दर चिंताजनक वेगाने वाढत आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराचा पर्यायी स्रोत शोधण्याची गरज आहे आणि गावकऱ्यांशी संवाद साधल्यास त्यांना तळागाळातील जीवनव्यवस्था समजण्यास नक्कीच मदत होईल. त्यानुसार ते स्वतःचे रोजगार मॉडेल तयार करू शकतात जे त्यांना कमावण्यास मदत करेल तसेच गावाचा विकास साधेल असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
फादर कार्लिस्टो कोएल्हो यांनी युरी आलेमाव यांनी आमदार म्हणून बजावलेल्या स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की डॉन बॉस्को संस्था नेहमीच सामाजिक कारणांसाठी कार्य करतात आणि गरीब व गरजवंतांच्या भल्यासाठी प्रयत्न करतात.
पाच दिवसीय शिबिरामुळे सामाजिक कार्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिेक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांशी संवाद साधण्याची आणि ग्रामजीवन आणि ग्रामीण कामकाजाचे ज्ञान मिळवण्याची संधी मिळाली.
डॉन बॉस्को कॉलेज दरवर्षी अशी शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांना खेड्यात राहणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्याची संधी देते. या शिबिरांमुळे ग्रामस्थांचे जीवनमान सुधारण्यासही मदत होते.