पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ
पणजी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला राज्यात येत आहेत. यासाठी नेतेमंडळी, पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. या अतिमहनीय व्यक्तीच्या दौऱ्यात सुरक्षा यंत्रणेत कसर राहू नये, यासाठी काल पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सत्रे सुरू होती. शिवाय पणजीतील मांडवी किनाऱ्यासह कार्यक्रमस्थळ आतापासूनच पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असून संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली आहे.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ व आयुर्वेद इस्पितळ उद्घाटन तसेच जागतिक आयुर्वेद परिषदेच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व आमदार तसेच सरकारी अधिकारी व पोलिसांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्यांच्या आगमनामुळे सर्वत्र सरकारी पातळीवर तसेच पोलिस खात्यामध्ये लगबग आहे. यानिमित्त पणजी फेस्तची फेरी पुढे ढकलण्यात आली असून ती 12 डिसेंबरपासून सुरू होईल.
राज्यात एकीकडे रात्री दहानंतर रेव्ह पार्ट्यांना ऊत आला आहे व त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, सरकारकडून पंतप्रधानांच्या सुरक्षिततेसाठी अधिक महत्त्व देऊन पोलिस यंत्रणेचा त्यासाठी वापर केला जात आहे.
पंतप्रधानांच्या गोव्यातील वास्तव्याच्या काळात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांची तालीम सुरू आहे व काही पोलिसांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेसंदर्भात पोलिस खात्यात तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठका घेऊन त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. पंतप्रधान येण्यास 4 दिवस बाकी असले तरी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठी 11 डिसेंबरला नाविकांनी मांडवी आणि झुआरी पुलांच्या पश्चिमेला जलवाहतूक न करण्याचा बंदर कप्तान खात्याने आदेश काढला आहे. सर्व बार्ज मालक, प्रवासी नौका, फेरीबोट, मासेमारी ट्रॉलरचे तांडेल, क्रूझ जहाज यांना हा आदेश लागू होणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये गुंतलेल्या नौका आणि जहाजांना मोकळीक देण्यात आली आहे. निर्देशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा खात्याने दिला आहे.