‘म्हादईचा वैज्ञानीक अभ्यास न करता डीपीआर कसा मंजूर झाला?’
मडगाव : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी गोव्यावर रेल्वे डबल ट्रॅकिंगसह विनाशकारी तीन रेषीय प्रकल्प सक्तीने लादण्यापूर्वी कोणताही वैज्ञानिक अभ्यास केला होता का, याचा खुलासा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हादईचे पाणी वळवण्यावर बोलण्यास नकार दिल्यावर प्रतिक्रिया देताना युरी आलेमाव म्हणाले की, भाजपच्या सर्व मंत्र्यांचा आवाज दिल्लीत नियंत्रित केला जातो. भुपेंद्र यादव यांच्या मर्यादा मी समजू शकतो, असे आलेमाव म्हणाले.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार जर म्हादईचे पाणी वळवण्यावर वैज्ञानिक अहवालाचा अभ्यास झालाच नसेल , तर कळसा भंडुरा प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी कशी मिळाली आणि वैज्ञानिक अहवालाचा अभ्यास न करताच डीपीआर मंजूर झाला का ? असा सवाल युरी आलेमाव यांनी केला आहे.
केंद्र आणि राज्यात सत्तेत आल्यापासून डबल इंजिन भाजप सरकारे गोव्याचा विश्वासघात करत आहेत हे स्पष्ट आहे. भाजप सरकारला शेतीयोग्य जमिनी नष्ट करायच्या आहेत, मासेमारी व्यवसाय संपवायचा आहे आणि गोवा भांडवलदारांच्या हवाली करायचा आहे. भाजप सरकारचे प्रत्येक धोरण हे गोवाविरोधी आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
रेल्वे डबल ट्रॅकिंग, वीज वाहिनी टाकणे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारासह तीन रेषीय प्रकल्प गोव्यात केवळ क्रोनी कॅपिटलिस्टच्या सोयीसाठी पर्यावरणाचा प्रचंड विध्वंस करुन राबविण्याचा प्रयत्न केला भाग जात आहे असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
केंद्र सरकारने आता मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीची क्षमता वाढवण्यास मान्यता दिली आहे. सागरमाला अहवालात मुरगांव बंदरातील कोळसा हाताळणी १३७ मी.टन पर्यंत जाईल हे स्पष्ट आहे. भाजप सरकार गोव्याला उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी मी पुन्हा एकदा जनतेला एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करतो. भाजप सरकारला आपली सर्व गोवा विरोधी धोरणे बदलण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.