ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांचे निधन
गोवा मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा साहित्यिक नागेश करमली (90) यांचे आज दुपारी त्यांच्या रायबंदर- पाटो येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवारी सकाळी 10 वाजता सांतिनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 05 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवशी प्रकृती बिघडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा दिसल्याने त्यांना घरी आणण्यात आले होते. करमली यांचा जन्म 1933 साली काकोडे येथे झाला.
गोवा मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा साहित्यिक नागेश करमली यांच्या निधनाचे वृत्त दुख:द आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रर्थना करतो. गोवा मुक्तीसाठी त्यांनी दिलेले योगदान गोवा नेहमीच लक्षात ठेवेल. अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे.
नागेश करमली यांना 1972 मध्ये ताम्रपट देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. 1992 साली त्यांच्या ‘वंशकुळाचे ‘देणे’ कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला.
2008 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते त्यांचा गौरव झाला होता. कोकणी भाषा मंडळ स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. गझल हा प्रकार त्यांनी कोकणीत रुळवला.