मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी प्रतापगड स्वच्छता मोहीम
सातारा (महेश पवार) :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनानिमित्त किल्ले प्रतापगडावर बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या प्रतापगड स्वच्छता अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाला. गडकोटप्रेमींच्या आग्रहास्तव लवकरच सिंहगडावर स्वच्छता मोहिम राबवू, असे याप्रसंगी पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात आरोग्य शिबीर, रक्तदान, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व आवश्यक साहित्य वाटप, रुणांना फळे व मेडीकल कीट वाटप आदी कार्यक्रम बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने राबविण्यात आले. विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यात तसेच जावली तालुक्यात जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. सर्वच कार्यक्रमांना शिवसैनिक तसेच सर्वसामान्य जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी किल्ले प्रतापगड स्वच्छता अभियान घेवून गडावर छत्रपतींचा पुतळा परिसर तसेच मुख्य प्रवेशद्वार परिसरात स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, नागरिक, बालचमू तसेच पर्यटकांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी पुरुषोत्तम जाधव म्हणाले, किल्ले प्रतापगडावर सर्वत्र स्वच्छ परिसर असून पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृकता आल्याचे पाहून समाधान वाटले. आजच्या अभियानादरम्यान दोन गोणी कचरा गोळा करण्यात आला. लोकांच्या आग्रहाखातर लवकरच सिंहगडावर स्वच्छता मोहिम राबवू, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी श्री भवानी मातेचे सर्वांनी दर्शन घेतले. त्यानंतर पुतळा परिसरात छत्रपतींना अभिवादन करुन स्वच्छता अभिमानाला प्रारंभ केला. यावेळी पुरुषोत्तम जाधव यांच्या समवेत युवा नेते विकास आण्णा शिंदे, गणेशदादा सावंत, धनंजय चव्हाण, अविनाश भोसले, समीर शिंदे, प्रथमेश ढोणे, सचिन वायदंडे, दत्ताभाऊ पोळ, तुकाराम तुपे, संग्राम सपकाळ, विशाल फणसे, स्वप्नील त्रिंबके, सलमान मुलानी, आझाद मुलाणी, प्रवीण सावंत, बिरू पुजारी, सचिन तावरे, राजेश सुतार, शुभम शिंदे, निनाद येवले आदी उपस्थित होते.