धान्यातील पावडरीच्या वासाने चिमुकल्यांचा मृत्यू..?
सातारा (महेश पवार) :
मुंढे कराड येथील चिमुकल्या सख्या बहिण-भावाचा गुदमरून मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोघांनाही त्रास झाल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.
श्लोक अरविंद माळी (वय 3 वर्षे) व तनिष्क अरविंद माळी (वय 7, दोघेही रा. मुंढे, ता. कराड) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान या उग्र वासामुळेच श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे सोमवार दिनांक 13 रोजी प्रथम तीन वर्षाच्या श्लोकला उलट्या व खोकल्याचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्याला कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्का हिलाही मंगळवारी उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिलाही नातेवाईकाने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचार सुरू असताना तिचाही मंगळवारी मृत्यू झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर त्यामध्ये अंतरगत अति रक्तस्त्रावामुळे व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर तनिष्काचे मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.