‘पाटणचं पापाचं पितर कोण ते शंभू की चंबू’
सातारा (महेश पवार) :
मराठी माणसाचा स्वाभिमान रहावा यासाठी शिवसेनेला पाटणच्या स्व. बाळासाहेब देसाई, अण्णासाहेब पाटील यांनी ताकद दिली. शिवसेना हे कधीही विसरणार नाही. म्हणून तर स्व. बाळासाहेब देसाईंच्या नंतर ३७ वर्षांनी देसाई घराण्याला मंत्रीपद शिवसेनेनेच दिलं. परंतू, पाटणचं पापाचं पितर कोण ते शंभू की चंबू? (उपस्थितांमधून चंबू आवाज व हशा) शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली अशी जोरदार टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर करून शिवसेना संपणार नसल्याचे ठणकावले.
शाहूकला मंदीर येथे शुक्रवार दि. ३ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आयोजित शिवगर्जना अभियान कार्यक्रमात खा. संजय राऊत बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार बाबुराव माने, लक्ष्मण हाके, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हणमंतराव चौरे, हर्षल कदम, संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मी निवडणूक आयोगाला शिवी दिली अशी ओरड होतेय. ज्याची जशी लायकी तशी भाषा वापरायला लागते, असे सांगून खा. संजय राऊत म्हणाले, पन्नास खोके एकदम ओके अशी आरोळी उपस्थितांमधून येताच खा. राऊत म्हणाले, ही देशातील लोकप्रिय शिवी झाली आहे. गद्दारांची अवस्था दीवार सिनेमातील बच्चन सारखी झाली आहे. उद्या यांचीच पोरं ‘मेरा बाप गद्दार है’ अशी म्हणतील, असे सांगून खा. राऊत पुढे म्हणाले, शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना एखाद्या गाडीसारखी आहे, पुढून ५० उतरले तर मागून शंभर जण गाडीत चढतात. शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या आजही कमी झाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याच्या संधीचा फायदा घेवून या तुमच्या पंताने व मिंध्याने कट रचला व माणुसकीला काळिमा फासणारे कारस्थान केलं. तुमच्या सारख्या मर्द मावळ्यांनी याचा सूड घेतला पाहिजे, हेच सांगायला मी इथं साताऱ्याला आलो आहे. जे पळून गेले त्याचं नाव गद्दार म्हणून इतिहासात नोंद होईल. यांना गाडायचं अशी घोषणा जिथं जाईल तिथं ऐकायला मिळतेयं. गद्दारांना सोडू नका अशी महाराष्ट्रातील लोकांची भावना आहे. शिवसेना नसेल तर मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही असचं लोकांना वाटत आहे, असे सांगून मोदी, शहांनी देश विकला असल्याचे खा. राऊत यांनी शेवटी स्पष्ट केले.
कार्यक्रमात जिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, आमच्या मतदार संघाला वालीच राहिला नाही. येथील आमदार भाजपचे आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना विशेष आमदार निधी आणला असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. येथील शिवसैनिक निष्ठावंत आहे. उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे मोहिते यांनी सांगितले. कार्यक्रमात माजी आमदार बाबुराव माने, लस्मण हाके,धनावडे, प्रदिप झणझणे, विकास नाळे फलटण, गणेश जाधव खंडाळा, अमोल आवळे, संजय देशमुख, हर्षल कदम आदींची भाषणे झाली.