साखळी, फोंडा पालिकेवर भाजपचा झेंडा
साखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीत भाजपाने दणदणीत यश मिळवले आहे. साखळीतील एकूण 12 जागांपैकी 11 तर फोंडा तील 15 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत.
दोन्ही नगरपालिकेतील भाजपच्या यशाबाबत राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी मतदरांचे आभार मानले आहेत.
साखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीत भाजपला निर्विवाद सत्ता मिळाली. तर साखळीतील लोकांनी भाजपाने गेल्या 12 वर्षात केलेल्या विकासकामांना साथ देऊन नगरपालिकेत सत्तांतर घडवले याबद्दल तमाम साखळीतील जनतेचे आभार’, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या यशाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘साखळीतील लोकांना कळून चुकल्याने तसेच भाजपाने केलेला विकास पाहिल्याने त्यांनी सत्तांतर घडवून आणले,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘दोन्ही शहराचा नगराध्यक्ष कोण हे कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून ठरवला जाईल’, असेही त्यांनी सांगितले.
उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील लोक भाजपाच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे या निकालामुळे स्पष्ट झाले असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
‘गतवर्षीची विधानसभा निवडणूक आणि त्यापूर्वी झालेल्या जिल्हा पंचायत, नगरपालिका आणि ग्राम पंचायत निवडणुकीत गोमंतकीय नागरिकांनी भाजपाला भरभरून यश दिले. साखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीत लोकांनी भाजपावर असलेला आपला विश्वास अधिक दृढ केला आहे याबद्दल पक्षाच्यावतीने साखळी आणि फोंडा शहरातील नागरिकांचे आभार.’ अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असतानाही त्यांनी साखळी पालिका निवडणुकीतही लक्ष दिले. या दोन्ही शहरातील पक्षाचे नेते, पदाधिकारी, संघटन आणि कार्यकर्ते यांनी पक्षासाठी अहोरात्र केलेल्या कष्टाचे हे फळ आहे.’
‘पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपासाठी हे शुभ संकेत असून यावेळी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून येतील.’ असेही तानावडे म्हणाले.