सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडत विराट कोहलीने (virat kohli) वर्ल्डकप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत ५०व्या शतकाला गवसणी घातली. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर धाव घेत विराटने हा विक्रम नावावर केला. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. बुधवारी मुंबईत उष्ण आणि आर्द्र वातावरणातही विराटने संयमी खेळ करत खणखणीत शतकाची नोंद केली.
विराटचं (virat kohli)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ८० वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या (virat kohli) नावावर २९ तर ट्वेन्टी२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटचं (virat kohli) वनडेतलं न्यूझीलंडविरुद्धचं हे सहावं शतक आहे. मायदेशातलं कोहलीचं हे २२वं शतक आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी दिलेल्या ७१ धावांच्या सलामीनंतर रोहित बाद झाला. विराटने नेहमीप्रमाणे एकेरी दुहेरी धावांसह डावाला सुरुवात केली. प्रचंड उकाड्यामुळे विराटलाही क्रॅम्प्सचा त्रास जाणवला मात्र या कशानेही त्याच्या एकाग्रतेवर परिणाम झाला नाही. वर्ल्डकप स्पर्धेत बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी नसणाऱ्या विराटने या शतकासह सगळं अपयश धुवून काढलं. शतकानंतर मैदानात उपस्थित मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कुर्निसात करत विराटने ५०वं शतक साजरं केलं.
साऊदीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा कोहलीचा प्रयत्न डेव्हॉन कॉनवेच्या हातात जाऊन विसावला. विराटने ९ चौकार आणि २ षटकारांसह ११७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. विराटच्या शतकी खेळींचं वैशिष्ट्य म्हणजे भागीदाऱ्या. विक्रमी ५०व्या शतकादरम्यानही विराटने भागीदाऱ्यांची परंपरा कायम राखली. विराटने शुबमन गिलच्या साथीने ८६ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली. दुखापतीमुळे गिल तंबूत परतल्यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने १२८ चेंडूत १६३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली.