पर्वरी येथील गृहनिर्माण मंडळाच्या जमिनीवर पर्यटन विभागाने बेकायदेशीररीत्या आयोजित केलेल्या नरकासूर स्पर्धेमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी काँग्रेस पक्षावर आरोप करणारे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आता हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल भाजप सरकारचा निषेध करण्याचे धाडस करावे, अशी माझी मागणी आहे, असे काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
आज काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अमरनाथ पणजीकर यांनी पर्वरी येथील नरकासुर स्पर्धा दिवाळीच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत चालू ठेवून पर्यटन खात्याने पहाटे नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा मोडीत काढल्याचा आरोप केला.
आजच्या पत्रकार परिषदेला उत्तर गोवा जिल्हा सचिव प्रणव परब, कुंभारजुवा गट कॉंग्रेस अध्यक्ष विशाल वळवईकर आणि सांताक्रुझ गट कॉंग्रेस अध्यक्ष जॉन नाझारेथ उपस्थित होते.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी 13 नोव्हेंबर रोजी पर्वरी येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला ते स्वतः का अनुपस्थित होते याचे स्पष्टीकरण द्यावे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि रोहन खंवटे यांनी तेथे जाब विचारण्यास आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रश्नाना उत्तरे देण्याचे धाडस नसल्यानेच घाबरून कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.
स्थानिक आमदार आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे हेच दूर राहिलेल्या व अखेर फ्लॉप शो ठरलेल्या नरकासुर कार्यक्रमावर पर्यटन विभागाने जनतेचा करोडोचा पैसा खर्च केला आहे. एकच गद्दार आमदार बक्षीस वितरणासाठी गेला होता कारण त्याला कुठेही जाण्याची सवय आहे, असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी लगावला.
सनातन धर्माच्या परंपरांचा आदर न करणाऱ्या भाजप सरकारची ही लाजिरवाणी कृती आहे. बेजबाबदार पर्यटन विभागाकडून स्पर्धेदरम्यान पाश्चात संगीत वाजवण्यात आले. गोव्याची खरी संस्कृती पर्यटकांना दाखविण्याची जबाबदारी असलेल्या पर्यटन खात्याचे हे मूर्खपणाचे कृत्य आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले