सुदिन ढवळीकर यांनी स्वत:च्या आमदाराकडे लक्ष द्यावे ; युरींचा टोला
फोंडा :
देवाने गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेसने नामांकीत केलेले इंडियाचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा स्पष्ट “प्रसाद” वीज मंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांना दिल्याची मला पूर्ण खात्री आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
सुदिन ढवळीकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे तीनही आमदार दुसऱ्या पक्षात जातील, या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना युरी आलेमाव यांनी सुदिन ढवळीकर यांनी स्वत:च्या आमदाराकडे लक्ष द्यावे असा टोला हाणला.
पक्षांतर विरोधी कायदा अधिक मजबूत करण्यासाठी संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचे स्पष्ट आश्वासन काँग्रेस पक्षाने नागरिकांना दिले आहे. सुदिन ढवळीकर यांनी पक्षांतरांवर नेहमीच आवाज उठवला आहे. पक्षांतराबद्दल भाजपच्या जाहीरनाम्यात काहीही नाही. त्यांनी भाजपशी युती तोडून या महत्त्वाच्या मुद्द्यावर इंडियाला पाठिंबा द्यावा, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे तिन्ही आमदार एकत्र असून आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ राहू. आम्ही गोमंतकीयांचा विश्वास जिंकला असून आम्ही त्यांचा कदापी विश्वासघात करणार नाही, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वत:चे मगोचे आमदार सोबत आहेत की भाजपच्या मांडीवर बसले आहेत याचा शोध घ्यावा. त्यांनी आमची काळजी करू नये. आम्ही जेथे आहोत तेथे सुखी आहोत आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून कामगिरी करणे सुरू ठेवणार आहोत, असे युरी आलेमाव म्हणाले.
वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांना “पॉवर पॉइंट्स” वर विशेष ज्ञान आहे. सत्ता कोणत्या बाजूने असेल याचे संकेत त्यांना अगोदरच मिळतात. मोदी युग संपले आहे आणि भाजपच्या राजवटीवर पडदा येईल हे त्यांना कळले आहे. त्यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याने त्यांना असुरक्षित वाटत आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
मला खात्री आहे की जूनमध्ये दिल्लीत इंडिया आघाडीव सरकार स्थापन झाल्यावर सुदिन ढवळीकर आमच्या बाजूने असतील. त्याचीच तयारी त्यांनी सुरू केली आहे असे युरी आलेमाव यांनी सांगितले.