‘ही’ तर भाजपच्या पतनाला सुरूवात : युरी आलेमाव
काँग्रेसने आपला 21 वचनांचा गोवा केंद्रित जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर, भाजपला भूकंपाचे हादरे बसले. कला अकादमीची फॉल्स सिलिंग कोसळणे हा भाजपच्या गोटात आलेल्या भूकंपाचा पुरावा आहे. 19 एप्रिलला भाजपच्या पतनाला सुरुवात झाली आहे आणि 4 जून 2024 ला अहंकारी राजवट कोसळेल असा जबरदस्त टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
नुकत्याच नूतनीकरण केलेल्या गोवा कला अकादमीमध्ये फॉल्स सिलिंग कोसळल्याच्या आणखी एका घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे हे भाजपच्या विकसित भारताचे मॉडेल आहे अशा शब्दात भाजपला फटकारले.
या निवडणुकीच्या मोसमात निसर्ग आता भाजपचा भ्रष्टाचार उघड करत आहे. दोन दिवसांपूर्वी 1500 कोटींहून अधिक खर्च केलेल्या स्मार्ट सिटी पणजीला पूर आला होता. अटल सेतूवरील खड्ड्यांमुळे भाजपच्या राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट झाले होते असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
गोव्याची ओळख, पर्यावरण आणि नैसर्गिक सौंदर्य नष्ट करून भाजपने तथाकथीत विकास साधला. त्यांचा “विकसीत भारत” हा भाजपला करोडोंचा निधी देणाऱ्या क्रॉनी कॅपिटलिस्टचा विकास आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
सुमारे 75 कोटी खर्च करून केलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही केली होती. भाजप सरकारमध्ये सदर चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तात्काळ उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली चौकशी आयोग स्थापन करून कालबद्ध चौकशीचे आदेश द्यावेत, अशी माझी मागणी आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोव्यातील जनता लोकसभा निवडणुकीत भाजपला कायमचा धडा शिकवेल. भाजप पूर्णपणे कोलमडला आहे आणि आता गोमंतकीयांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अट्टाहास करत आहे. लोकांचे लक्ष बेरोजगारी, महागाई, वाढती गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारावर आहे आणि भाजपने या प्रमुख समस्यांना उत्तर द्यावी अशी जनतेची मागणी आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.