भाजपच्या क्रोनी कॅपिटलिस्टकडून काँग्रेस प्रलंबित 5000 कोटी वसूल करेल आणि… : युरी
मडगाव :
नक्कीच! काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी सरकार कॅसिनो जुगारावरील जीएसटी, हरित उपकर, ग्रामीण कल्याण उपकर, खाण थकबाकी, वीज बिल थकबाकी इत्यादींवरील अनेक कोटींची प्रलंबित देणी भाजपच्या क्रोनी कॅपिटलिस्टकडून वसूल करेल आणि जवळपास 5000 कोटींचा निधी सामान्य लोकांच्या कल्याणासाठी वापरेल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या वारसा करावरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, भाजप सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहे. प्रत्यक्षात भाजपला निधी देणाऱ्या भांडवलदारांनी बेकायदेशीरपणे जमा केलेली संपत्ती परत मिळवून सामान्य लोकांच्या कल्याणासाठी वापरली जाईल. यामुळेच भाजप बिथरला आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
सरकारने जाणूनबुजून खाण कंपन्यांकडून जवळपास 271 कोटी वसूल केले नाहीत. अदानी, वेदांता, जेएसडब्लू यांच्याकडून ग्रामीण कल्याण उपकरापोटी जवळपास 263 कोटी प्रलंबित आहेत, सरकार भाजपला निधी देणाऱ्या भांडवलदारांचा समावेश असलेल्या कंपन्यांकडून ग्रीन सेस वसुलीवर मंद गतीने पाऊले टाकत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
विनोद तावडे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बडे उद्योजक आणि व्यावसायिक आस्थापनांकडून वीज बिलांच्या प्रलंबित 1400 कोटींच्या वसुलीची विचारणा का केली नाही? कॅसिनो ऑपरेटर्सकडून अनेक कोटींचा जीएसटी वसूल करण्यासाठी सरकारने कारवाई का सुरू केली नाही? प्रलंबित वसुलीचे हे आकडे 5000 कोटींहून अधिक होतील, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
गोमंतकीयांना भाजपची ‘डर्टी ट्रिक्स’ आता कळते. दोन महिन्यांचे बिल थकीत झाल्यास सामान्य लोकांची वीज आणि पाण्याची जोडणी तोडली जाते, परंतु उद्योगपतींना वर्षानुवर्षे करोडोंची थकबाकी करण्याची भाजप सरकारची परवानगी आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
भाजपने खोटा प्रचार करणे थांबवावे. काँग्रेस पक्ष आता भाजपच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करण्यासाठी तथ्ये व आकडेवारीने सज्ज आहे. निधी देणाऱ्या श्रीमंत आणि धनाड्य लोकांप्रती भाजपच्या पक्षपातीपणावर खुल्या चर्चेत आमच्या कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्याला सामोरे जाण्याचे आव्हान आम्ही भाजपच्या नेत्यांना देतो, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.