सरकार निर्मित भ्रष्टाचाराच्या स्मारकांना गोमंतकीयांचा विरोध : युरी आलेमाव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “काहींना सरकारी प्रकल्पात अडथळे आणण्याची सवय आहे” या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, भांडवलदारांना खूश करण्यासाठी आमच्यावर जबरदस्तीने लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांना गोमंतकीय विरोध करतीलच असे स्पष्ट केले आहे.
कोणताही प्रकल्प प्रस्तावित करताना सर्वांना विश्वासात घेणे आणि संपूर्ण पारदर्शकता ठेवणे हे शासनाचे कर्तव्य आहे. गेल्या अकरा वर्षात भाजप सरकारने निकृष्ट दर्जाचे प्रकल्प तयार केले आहेत कारण कंत्राटदारांना भाजप भागधारकांना मोठ्या प्रमाणात कमिशन द्यावे लागते, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
भूतकाळातील काँग्रेस सरकारांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावनांचा आदर केला आणि तीन सेझ प्रकल्प आणि प्रादेशिक आराखडा लोकांच्या शक्तीपुढे नतमस्तक होवून रद्द केले. काँग्रेसने नेहमीच गोमंतकीयांच्या भावना आणि आकांक्षांची काळजी घेतली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
भाजप सरकारने पणजी स्मार्ट सिटीसाठी जवळपास 1500 कोटी रुपये, कला अकादमीच्या दुरुस्तीवर 75 कोटी, राष्ट्रीय खेळांवर 1000 कोटी आणि अटल सेतूवर 700 कोटी रुपये खर्च केले, परंतु कामाचा दर्जा अतिशय खराब झाल्याने नेहरू स्टेडियम, फातोर्डा येथील पत्रे उडणे, श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या दर्शनी भागाची पडझड होणे, अटल सेतूवर तयार झालेले खड्डे, कला अकादमीचा स्लॅब कोसळणे आदी बाबींवर युरी आलेमाव यांनी लक्ष वेधले.
भाजप सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेकडो निष्पाप गोमंतकीयांचे प्राण गेले आहेत. विद्युत खात्यावर 12 हजार कोटी रुपये खर्च करूनही विजेच्या धक्क्याने 65 व्यक्ती आणि 17 जनावरांचा मृत्यू झाला. बंच केबलिंग हा घोटाळा असल्याचे सिद्ध झाले आहे , असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालातून भाजपने धडा घ्यावा. गोव्यात 2027 मध्ये नवीन इंजिन सरकार असेल हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, असे युरी आलेमाव म्हणाले.