खाजगी सदस्य ठरावाच्या पहिल्या फेरीत “ओपिनियन पोल दिवस” आणि “एसटी राजकीय आरक्षण”
पणजी :
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या “ओपिनियन पोल दिवस” आणि केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांच्या “अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षण” ह्या खाजगी सदस्यांच्या ठरावासाठी निवड क्रमांकात अनुक्रमे तिसरे व पहिले स्थान मिळाले आहे. खाजगी सदस्यांचे ठराव शुक्रवार, 19 जुलै 2024 रोजी चर्चेसाठी येतील. आता सभापती रमेश तवडकर हे दोन्ही ठराव मान्य करून येत्या अधिवेशनात चर्चेसाठी घेतात का, हे पाहायचे आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडलेला ठराव सरकारला 16 जानेवारी हा दिवस अधिकृत राज्य कार्यक्रमाने ‘अस्मिता दिवस-ओपिनियन पोल डे’ म्हणून साजरा करण्याची मागणी करणारा आहे.
केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांच्या खाजगी सदस्य ठरावात सरकारने गोव्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.
मला आशा आहे की सभापती माझा खाजगी सदस्य ठराव मान्य करतील आणि सर्व 40 आमदार त्याला पाठिंबा देतील. गोव्याने ओपिनियन पोल दिन मोठ्या उत्सवाने साजरा करण्याची गरज आहे कारण हा दिवस गोव्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
अनुसूचित जमाती त्यांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा देत आहेत. आता निवडून आलेल्या सर्व आमदारांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीप्रती एकता दाखवावी. मला आशा आहे की एसटी समाजाचे एक नेते असलेले सभापती रमेश तवडकर माझा ठराव दाखल करतील आणि त्यावर चर्चेला परवानगी देतील, असे केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता म्हणाले.