
अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे गोव्याच्या निसर्ग, जीवनशैली आणि अस्तित्वावर सरळ हल्ला : काँग्रेस
केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोव्यात अणुऊर्जा (nuclear) प्रकल्प स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ही बातमी अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. हा प्रस्ताव म्हणजे भाजप सरकारच्या गोव्यासाठी असलेल्या बेपर्वा, असंवेदनशील आणि विध्वंसक दृष्टिकोनाचं स्पष्ट दर्शन आहे, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रसिद्धी प्रत्रकातून दिली आहे.
गोवा हा भाजपच्या धोकादायक प्रयोगांचा प्रयोगशाळा नाही आणि होणारही नाही. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी, माझ्या नेतृत्वाखाली, या प्रस्तावाचा तीव्र निषेध करते. गोव्याच्या पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, आणि पारंपरिक व्यवसायांसाठी हे संकट ठरू शकते आणि त्यामुळे आम्ही या निर्णयास कदापिही मान्यता देणार नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
गोवा ही निसर्गसंपन्न भूमी आहे — समुद्रकिनारे, जैवविविधता, निसर्गरम्य जंगलं आणि मत्स्य व्यवसाय यावर आधारीत अर्थव्यवस्था असलेला आपला प्रदेश. अणुऊर्जा (nuclear) प्रकल्पामुळे या सर्वांवर कायमस्वरूपी धोका निर्माण होईल. चर्नोबिल आणि फुकुशिमा यांसारख्या दुर्घटनांचा अनुभव जगाने घेतलाय. एक लहानशी चूकसुद्धा हजारो जीव घेतो आणि अनेक पिढ्यांना परिणाम सहन करावा लागतो. गोवा अशा धोकादायक प्रकल्पासाठी भूगोल, संसाधने आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अजिबात सक्षम नाही, असे पाटकर यांनी यावेळी अधोरेखित केले.
अणुऊर्जा प्रकल्पासाठी मोठा भांडवली खर्च लागतो, अफाट पाण्याचा वापर होतो, अत्यंत धोकादायक कचरा निर्माण होतो आणि त्याच्या सुरक्षित साठवणुकीसाठी कोणतेही दीर्घकालीन उपाय अद्याप अस्तित्वात नाहीत. हे सर्व पाहता, गोवा हा अणुऊर्जा प्रकल्पासाठी अनुकूल प्रदेश नाही — आणि गोमंतकियांना तो मंजूर नाही.
हा प्रस्ताव म्हणजे केवळ पर्यावरणीय किंवा आर्थिक संकट नव्हे, तर राजकीय कटकारस्थानी कारस्थान आहे. गोव्यातील जमिनी, संसाधने आणि नागरिकांच्या सुरक्षेवर भाजपकडून सुरू असलेला हा नियोजित आक्रमण आहे, असे आपल्या पत्रकात त्यांनी नमूद केले आले.
काँग्रेस पक्ष या प्रस्तावाला जोरदार विरोध करेल. जर केंद्र सरकारने हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर, सभागृहात आणि न्यायालयात तीव्र आंदोलन उभारू. गोव्याचं भविष्य कोणत्याही राजकीय फायद्याच्या बदल्यात तडजोडीला ठेवू दिलं जाणार नाही.
मी सर्व गोमंतकीयांना, पर्यावरणवादी संघटनांना, नागरी समाजाला आणि सर्व विरोधी पक्षांना आवाहन करतो — या संकटाविरोधात एकत्र या. हे केवळ पर्यावरण वाचवण्याचं आंदोलन नाही — हे गोव्याच्या अस्मितेचं आणि अस्तित्वाचं आंदोलन आहे. गोवा विकला जाणार नाही. गोवा झुकणार नाही. गोवा लढेल, असा निश्चय यावेळी अमित पाटकर यांनी व्यक्त केला.