‘अभयसिंहराजेंच्यानंतर परळी भागाचा विकास झालाच नाही’
सातारा :
स्व. अभयसिंहराजेंनी परळी भागाचा विकास करून कायापालट केला. मात्र त्यांच्यानंतर आमदार झालेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी या भागात विकासकामे केली नाहीत. राष्ट्रवादी पक्षाशी सुद्धा ते एकनिष्ठ राहिले नाहीत, अशा शब्दात राजेंद्र लवंगारे यांनी शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा साधला. या भागात रस्त्यांच्या कामासाठी आलेला निधी रस्त्यावर कमी तर ठेकेदाराच्या खिशात जास्त असा भ्रष्ट प्रकार सुरु आहे. ही स्थिती बदलण्यासाठी व परळी भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून द्या, असे आवाहन लवंगारे यांनी केले.
राजापुरी, ता. सातारा येथे आयोजित राष्ट्रवादी काँगेसच्या मेळाव्यात लवंगारे बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते सुनिल माने, दीपकबापू पवार, अमित कदम, शशिकांत वाईकर, राजकुमार पाटील, सीमा जाधव, ज्ञानदेवबापू मोरे, दिलीपराव चाळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राजेंद्र लवंगारे पुढे म्हणाले. स्व. अभयसिंहराजेंनी केलेल्या विविध विकासकामांमध्ये येथील लोकांचे योगदान होते. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी अभयसिंहराजेंना मंत्रीपदांसह बरचं काही दिलं. त्यामुळेच शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ रहायला पाहिजे होतं. परंतु ते भाजपात गेले. तुम्ही बघताय भाजापात कशा एकमेकाविरोधात लाथाळ्या सुरू आहेत. त्यामुळे शिवेंद्रराजेंना मंत्रीपद मिळणं अवघड आहे. हे सरकार लवकरच जाणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. खरंतर ते परळीत मेळाव्यासाठी येणार होते. पुढच्या मेळाव्याला ते नक्की येतील असे सांगून शेवटी परळी भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा आमदार करा, असे आवाहन लवंगारे यांनी केले.
कार्यक्रमात दीपकबापू पवार, सुनिल माने, अमित कदम आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात राजापुरीसह भागातील ग्रामस्थ मोन्या संख्येने उपस्थित होते.