अमेय पोरोब धारवाडकर ठरला “द यूथ इंजिनिअरिंग आयकॉन 2023”
पणजी :
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिलेल्या असामान्य योगदानाबद्दल गोव्यातील युवा अभियंते अमेय पोरोब धारवाडकर यांना इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा प्रतिष्ठेचा “द यूथ इंजिनिअरिंग आयकॉन अवॉर्ड 2023” देण्यात आला आहे.
अमेय पोरोब धारवाडकर हे अमेरीकेच्या मेटा कंपनीमध्ये मशीन लर्निंग अभियांत्रिकी व्यवस्थापक आहेत. ते सध्या फेसबुक व्हिडिओ शिफारसी रँकिंग टीमचे नेतृत्व करतात. बार्देस तालुक्यातील अस्नोडा गावचे अमेय हे नीता आणि दिवंगत डॉ. अजित धारवाडकर यांचे सुपुत्र आहेत. गेल्या नऊ वर्षांत, वैयक्तिकरण मॉडेल तयार करण्यात आणि सुधारण्यात त्यांच्या योगदानाने फेसबुकच्या वापरकर्त्यांची असाधारण वाढ झाली आहे.
फेसबुक वॉच आणि रील्सना जगातील सर्वात मोठ्या व्हिडीओ शिफारस सिस्टीममध्ये नेण्यात त्यांचे कौशल्य मोलाचे ठरले आहे. त्यामुळेच आज फेसबुकच्या मासिक वापरासाठी दररोज दोन अब्जाहून अधिक वापरकर्ते आकर्षित होत आहेत. विशेष म्हणजे, न्यूज फीड आणि अॅड्स मशीन लर्निंगमध्ये त्यांच्या बहुमोल योगदानामुळे मेटा व फेसबुकची वापरकर्ता प्रतिबद्धता आणि महसूल लक्षणीयरीत्या वाढला आहे.
भारतातील तिरुचिरापल्ली येथिल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या, अमेयचा तंत्रज्ञान जगतातील कारकिर्दीचा प्रवास भारतातील सर्वात लहान राज्य गोव्यातून झाला. गोव्यातच त्याने शिक्षणाचे बाळकडू घेतले.
अमेयच्या योगदानाची समृद्धता त्याच्या विपुल संशोधनाने अधोरेखित केली आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पेटंट परिषदांमध्ये सादरीकरण केले असून तज्ञांकडून वाहवा मिळविली आहे. व्यावसायीक पक्षपातीपणाचा प्रतिकार करणे आणि अब्जावदी वापरकर्त्यांच्या शिफारस प्रणालींमध्ये त्यांच्या हितसंबंधांचा शोध घेणे हे अमेयच्या कार्याचे दूरगामी परिणाम आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीमधील उद्योग धोरणांना आकार देण्यावर त्यांचा सध्या भर आहे.
गोव्यातील तंत्रज्ञान अभियंते अमेय धारवाडकर यांचा शांत व निसर्गसंपन्न गोवा ते एआय इनोव्हेशनचे एक संवर्धक असा प्रवास प्रेरणादायी आहे. उत्कृष्टता, नवकल्पना आणि मार्गदर्शनासाठीचे त्यांचे समर्पण केवळ मेटा व फेसबुकच्या जागतिक यशाला चालना देत नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सतत विकसित होत असलेल्या व्यावसायीक प्रणालीत एक दूरगामी पाऊल ठरले आहे.