गोवा

बाबू नायक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

मडगाव : गोव्याचे माजी आमदार, माजी विरोधी पक्षनेते, माजी उद्योगमंत्री तथा राज्यातील दूरदृष्टीचे नेते अनंत (बाबू) नरसिंह नायक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९ ऑगस्ट २०२६ ते १९ ऑगस्ट २०२७ या कालावधीत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा जन्मशताब्दी उत्सव समितीने केली. समितीची पहिली बैठक मडगाव येथे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.


“अनंत (बाबू) नरसिंह नायक यांची जन्मशताब्दी ही केवळ एका महान नेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्याची संधी नसून, त्यांच्या दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेच्या मूल्यांमधून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा संकल्प आहे. त्यांचा विचार आणि वारसा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती वर्षभर अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित करेल,” असे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी सांगितले.


ते म्हणाले, अनंत (बाबू) नरसिंह नायक यांचे योगदान केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. समाजकार्य, अध्यात्म, कला-संस्कृती आणि विशेषतः गोव्याची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख व महेंद्र आल्वारीस, कुटुंब प्रतिनिधी पांडुरंग (भाई) नायक, सचिव अनिल पै, कोषाध्यक्ष गौतम वेर्लेकर तसेच निमंत्रक विशाल पै काकोडे उपस्थित होते.


समितीने जन्मशताब्दी वर्षाचा व्यापक आराखडा मंजूर केला. १९ ऑगस्ट २०२६ रोजी जन्मशताब्दी वर्षाचा उद्घाटन सोहळा होणार असून, त्याच दिवशी ‘लोकनायक’ या माहितीपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात येणार आहे.


जन्मशताब्दी वर्षात स्मरणार्थ टपाल तिकीटाचे अनावरण, समुदाय कल्याण उपक्रम, राज्यभर शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक कार्यक्रम, तसेच ‘लोकशाही मूल्ये आणि गोव्याची अस्मिता’ या विषयावर विद्यमान व माजी आमदारांचा विशेष परिसंवाद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय बाबू नायक यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव करणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


१९ ऑगस्ट २०२७ रोजी जन्मशताब्दी वर्षाची सांगता होणार असून, त्यावेळी समारोप समारंभासह ‘अनंत – इन्फिनिट’ या स्मरणग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या ग्रंथातून अनंत (बाबू) नरसिंह नायक यांचे जीवनकार्य, नेतृत्व आणि त्यांचा चिरंतन वारसा यांचा वेध घेण्यात येणार आहे.


बैठकीत सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा, लोकसेवा, लोकशाही मूल्ये आणि गोव्याची अस्मिता जपणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्णय समितीने घेतला.


आजच्या बैठकीला अनिल खंवटे, उल्हास वेर्लेकर, प्रवास नायक, विवेक के. नाईक, प्रविणकुमार गोसालिया, साईश पाणंदीकर, मुकेश सगलानी, सगुण ऊर्फ दादा नायक, श्वेता कोरगांवकर,आर्थुर डिसिल्वा, राजू नांबियार, व इतरांनी उपस्थित राहून आपले विचार मांडले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!