बाबूश – विश्वजीत यांचा ओडीपीवरून एकमेकावर निशाणा
मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू झाल्यानंतर मंत्र्यांमधील मतभेद हळू हळू समोर येत आहेत. भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत नगर नियोजन खात्याच्या (टीसीपी) ओडीपींवरून नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागितल्यानंतर महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही आपल्याला विचारल्याशिवाय पणजी आणि ताळगावांत प्रस्ताव मंजूर करू नयेत अशी भूमिका घेतली. मोन्सेरात यांच्या या भूमिकेवर विश्वजीत राणेही आक्रमक झाले असून ज्यांनी मोठमोठे प्रकल्प उभारले त्यांनी नगर नियोजन खात्यावर दबाव आणू नये असे स्पष्टच म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात असताना भाजपच्या दोन महत्त्वाची खाती असलेल्या मंत्र्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. त्यामुळे आज गडकरी यांच्याकडून मंत्र्यांना सबुरीचा सल्ला अपेक्षित आहे.
मोन्सेरात यांणी पणजीतील जमीन रुपांतरावरून नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर टीका केली आहे. मोन्सेरात यांच्यामते अन्य मंत्रीही राणे यांच्यामुळे नाराज आहेत. बुधवारी म्हापसा येथे पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राणे यांच्या नगरनियोजन खात्यातील कारभाराविषयी पक्षाने स्पष्टीकरण मागितले होते. राणे यांनी आपल्याबाजूने पक्षाला स्पष्टीकरण दिले असले तरी पक्ष त्यावर समाधानी नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते सध्या राणे यांच्या नगर नियोजन खात्यातील जमीन रुपांतराविषयी समाज माध्यमांवर उघडपणे बोलत असल्यामुळे भाजपला हे नुकसानीचे ठरत असल्याचे कोअर कमिटीचे म्हणणे आहे. लाखो चौरस मीटर जमीन रुपांतरीत केली जात आहे. त्यावर कोणाचे नियंत्रण नाहीच शिवाय मंत्री, आमदारांना विश्वासात घेतले जात नाही असा दावा काही मंत्री आमदारांनी केला आहे. त्यामुळेच हा विषय कोअर समितीच्या बैठकीत आला होता. मोन्सेरात यांचेही तेच म्हणणे आहे.
जमीन रुपांतरावरूनच या दोन्ही मंत्र्यांमध्ये सध्या मतभेद निर्माण झाले असून नितीन गडकरी गोव्यात असताना हा वाद उफाळून आला आहे. दरम्यान जमीन रुपांतराविषयी भाजपने उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अनेक आमदारांच्याही जमिनी रुपांतरीत केल्या जात असल्यामुळे भाजपही उघडपणे त्याबाबत बोलत नाही. राणे यांनी पक्षाच्या बैठकीत केलेल्या खुलाश्याबाबत पक्षातील काही वरिष्ठ नेते समाधानी नाहीत. जमीन रुपांतराच्या विषयामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा दावा काही नेत्यांनी केला आहे. गडकरी यांनी या वादाची दखल घेतली तर शुक्रवारी ते मंत्र्यांना सबुरीचा सल्लाही देऊ शकतात.
दरम्यान विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना योग्य ती माहिती दिली आहे.
सरकारमध्ये लवकरच काही बदल होणार आहेत. विधानसभा अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ फेररचना होणार आहे. त्यावेळी काही मंत्र्यांना हटवण्यात येईल तर काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होणार आहेत. त्यापूर्वीच या दोन मंत्र्यांमध्ये वाद सुरू झाल्यामुळे फेरबदलावेळी यांच्या खात्यांमध्येही फेरबदल होण्याची चाहूल या मंत्र्यांना लागल्याची चर्चा आहे.
काँग्रेसने या वादात उडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी जमीन रुपांतरणाची शिफारस करणाऱ्या नेत्यांची नावे विश्वजीत राणे यांनी उघड करावीत असे म्हटले आहे.