‘सिनेमॅटोग्राफरने प्रत्येक नवीन चित्रपटाकडे त्यांचा पहिला चित्रपट म्हणून पहावे’
गोवा येथील 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉन सील यांच्यासमवेत “इन -कन्व्हर्सेशन” सत्रात त्यांची प्रदीर्घ कारकीर्द आणि सिनेमॅटोग्राफी कलेबाबत त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. सील यांनी प्रत्येक चित्रपटासाठी नवीन दृष्टीकोन तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करून दृश्य कथाकथनात प्रकाशाच्या परिवर्तनीय शक्तीबाबत चर्चा केली. सिनेमॅटोग्राफीसाठी कोणतेही ठोस नियम नाहीत -प्रत्येक प्रकल्पासाठी, त्याची वैशिष्ट्यपूर्ण पटकथा, भूगोल आणि संदर्भासह नव्याने विचार करण्याची गरज असते यावर त्यांनी भर दिला.
सील यांचा प्रवास 1960 च्या दशकात सुरु झाला जेव्हा ऑस्ट्रेलियन चित्रपट उद्योग उदयास येत होता आणि त्यांनी माहितीपटांपासून नाटकापर्यंत विविध माध्यमांमध्ये काम केले आणि नोकरी करत असताना कलेचे शिक्षण घेतले. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी) सोबत काम करताना त्यांना घोड्यांच्या शर्यतीचे वृत्तांकन करणे आणि टेलिव्हिजन शॉर्ट्स चित्रित करणे यासह आपली कौशल्ये विकसित करता आली. घोड्यांच्या शर्यतीचे वृत्तांकन कसे करावे यावर मी एक दीर्घ व्याख्यान देऊ शकतो,” असे ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियन चित्रपट उद्योग जसजसा बहरला तसतसे, सील आणि त्यांच्या मित्रांनी अमेरिकेच्या सूत्रानुसार – “वाईड शॉट – मिडीयम -शॉट आणि क्लोज-अप”. प्रमाणे नव्हे तर उत्कटतेने चित्रपट बनवले . त्यांच्या या दृष्टिकोनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषत: अमेरिकेत कौतुक झाले, जिथे चित्रपट निर्मात्यांनी बजेट आणि वेळापत्रकाच्या मर्यादांमध्ये काम करण्याच्या ऑस्ट्रेलियन पद्धतीचे कौतुक केले. “सिनेमॅटोग्राफीसाठी कोणतेही नियम नाहीत . तुम्ही कदाचित एखाद्या चित्रपटासाठी खास शैली तयार केली असेल –मी त्याची प्रशंसा करेन आणि मी विचार करेन की मी ती पुढील चित्रपटात घेऊ शकेन. पण तसे नाही! प्रत्येक चित्रपट वेगळा असतो. ऑस्ट्रेलियात आम्ही ‘काय होईल जर ‘ पद्धत वापरतो. ‘असं झालं तर काय ?’ हे इथेच राहिले तर काय ?’
सील यांनी विश्वास व्यक्त केला की कॅमेरा व्यावसायिकांनी प्रत्येक प्रकल्पाकडे, जणू तो त्यांचा पहिलाच चित्रपट आहे, असे पाहिले पाहिजे. त्यांनी नमूद केले की, काळाच्या ओघात त्यांनी एकल कॅमेरा वापरत अनेक कॅमेऱ्यांकडे कसे संक्रमण केले, ज्यामुळे अभिनेत्यांचे अधिक प्रत्ययकारी चित्रण आणि सुधारित दृश्ये मिळू लागली. एका दृश्याच्या चित्रीकरणाची सुरेख आठवण त्यांनी सांगितली. अभिनेत्याने पटकथेमध्ये नसलेले टूथपिक खाली टाकण्याचे दृश्य दिले, हे सुधारित दृश्य आपल्याला आवडून गेल्याचे ते म्हणाले. “तेव्हा मला समजले की आपण हे एकाच वेळी दोन कॅमेऱ्यांसह क्रॉस-शूट केले पाहिजे.” त्यांनी सांगितले. “परंतु त्याकाळी आम्ही नेहमी आणीबाणीच्या प्रसंगासाठी, जर एखाद्याला काही तांत्रिक समस्या आली तर, एक अतिरिक्त कॅमेरा सोबत बाळगत असू. म्हणून मी फक्त ‘आणीबाणी’ असे ओरडलो आणि दिग्दर्शकाकडे पाहून डोळे मिचकावले. त्याला समजले आणि अशा प्रकारे आम्ही उर्वरित दृश्य दोन-कॅमेरा सेट अप करून चित्रित केले,” त्यांनी स्मित केले.
सील यांनी लाइटिंग कॅमेरामन आणि ऑपरेटर या दोघांचे महत्त्व अधोरेखित केले कारण त्यांच्यामुळे दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याशी जवळचे नाते निर्माण होते, जे आकर्षक चित्रपट तयार करण्यासाठी आवश्यक आहे. “जेव्हा माझे बरेच मित्र कॅमेरा व्यवसायात उच्च स्तरावर पोहोचले तेव्हा मी लाइटिंग कॅमेरामन आणि ऑपरेटर होण्यास प्राधान्य दिले कारण मला नेहमी वाटत असे की मी दिग्दर्शकाच्या जवळ राहून त्याला हवे ते दृश्यमानपणे आणण्यास मदत केली आहे.”
सील यांनी अभिनयात अभिनेत्याची बाजू समजून घेण्यासाठी केलेले त्यांचे प्रयत्न आणि कॅमेरा पर्सनच्या तांत्रिक बाबी त्यांच्या कामामध्ये कसा अडथळा आणू शकतात हे देखील सामायिक केले. “मला नेहमीच एक अभिनेता यांत्रिक होताना आढळतो जेव्हा त्याला योग्य फोकस किंवा दृश्य मिळविण्यासाठी जमिनीवरील ‘चिन्ह’ पाळावे लागते – जे बहुतेक कॅमेरा चमूने किंवा फोकस पुलरने चिन्हांकित केलेले असते.” हे त्यांचे काम नसून कॅमेरामनचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणून आपण स्वतः कॅमेऱ्यासाठी खुणा आखण्यास प्राधान्य दिले – जेणेकरून चमूला योग्य फोकस कुठे मिळवायचे हे कळेल आणि अभिनेत्यालाही याबद्दल काळजी करण्याची गरज उरणार नाही.
कलाकार एकदा का त्या पात्राच्या भूमिकेत शिरला की, चित्रिकरण करताना क्लॅपबोर्डचा आवाजही त्यांचे लक्ष विचलित करू शकते, हे टाळण्यासाठी आम्ही क्लॅप बोर्ड बदलला असे त्यांनी सांगितले., आम्ही आवाज अजिबात न करणारे म्हणजे स्लाइड-इन बोर्ड आणले. त्यामुळे त्याला किंवा तिला आपल्या भूमिकेमध्ये शिरून अभिनय करणे सहज शक्य होईल, हा त्यामागे विचार केला.’’
प्रेक्षक चित्रपट तल्लीन होवून पहात राहतील याची खात्री करून त्याप्रमाणे कथानक रंगवले. यामागे केलेला तात्विक विचारावर या सत्रामध्ये प्रकाश टाकण्यात आला. सील यांनी विशिष्ट क्षण पकडण्यामध्ये असलेल्या आव्हानांचे वर्णन केले. दर्शकांना गुंतवून ठेवतील असे क्षण आम्ही कॅमे-यामध्ये पकडले आहेत. जसे की, वादळी दृश्यातील कलाकारांच्या तीव्र भावनांचे व्यवस्थापन करण्याचे उदाहरण त्यांनी दिले. मागील कामांची पुनरावृत्ती टाळून प्रत्येक चित्रपटाला एक अनोखा प्रकल्प मानला पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला. प्री-प्रॉडक्शनचे महत्त्व आणि दिग्दर्शकाची दृष्टी समजून घेणे हे त्यांच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे होते. विशेषत: कॅमेरा लेन्ससारख्या तांत्रिक निवडींबाबत आपण खूप जागरूक असल्याचे सांगून या गोष्टीचा कलाकार आणि कथा या दोन्हींवर लक्षणीय परिणाम होऊ शकतात, असे ते म्हणाले. “तुम्ही प्री-प्रॉडक्शन दरम्यान जितके जास्त काम कराल, तितके चित्रीकरण करताना ते क्षण कॅमेऱ्यामध्ये पकडणे सोपे होते.” असा अनुभव त्यांनी सांगितला.
सील यांच्या संभाषणातून त्यांच्या अनुभवाची खोली आणि सिनेमॅटोग्राफीच्या कलेशी असलेली बांधिलकी दिसून आली. कलाकार आणि प्रेक्षक यांच्याशी घनिष्ठ संबंध राखून प्रत्येक नवीन चित्रपटासाठी त्यांना अनुकूल करणे आणि प्रत्येकवेळी काहीतरी नवनवीन करणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी सांगितले.
अपंग व्यक्ती (पीडब्लूडी) उत्तम सिनेमॅटोग्राफर होऊ शकत नाही, असा एक सामान्य विचार केला जातो. मात्र नवीन अत्याधुनिक कॅमेरे – डिजिटल दिव्यांग व्यक्तींना सिनेमॅटोग्राफर बनण्यास मदत करू शकतात, असे सांगून त्यांनी विश्वास व्यक्त केला की, नक्कीच कॅमेरे नवनिर्मिती करणा-या कोणालाही मदत करू शकतात. “ही स्क्रिप्ट आहे!” शारीरिक अपंगत्व एखाद्यामध्ये असलेली नवनिर्मितीची उर्मी रोखू शकत नाही, यावर त्यांनी भर दिला.