ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
भुईंज (महेश पवार) :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले.
भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी ४ वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केले.
त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून ३ वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले.
या कालावधीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचे योगदान दिले.
अत्यंत सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.
प्रतापराव भोसले यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे तीन सुपुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सूना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.
आज दुपारी ४ वाजता प्रतापराव भोसले यांची अंत्ययात्रा निघणार असून दुपारी ५ वाजता भुईंज येथे देगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत..
..
प्रतापराव बाबुराव भोसले (भाऊ) परिचय:
पत्ताः मु.पो.भुईज ता. वाई जि.सातारा (महाराष्ट्र)
जन्मतारीख: 25 ऑक्टोबर 1934
निधन : 19 मे 2024
शिक्षण: पी.एस.सी.
व्यवसाय: शेती
राजकीय कारकीर्द –
सरपंच, ग्रामपंचायत भुईज 1962 ते 1967
सदस्य, विधानसभा, महाराष्ट्र 1967 ते 1984
राज्यमंत्री, ग्रामिण विकास व पुनर्वसन 1978 ते 1980
कॅबिनेट मंत्री, ग्रामिण विकास 1983 ते 1985
संसद सदस्य, 1984 ते 1996
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी 1997 ते 2000
सरकारी समित्यांवरील कारकीर्द (भारत सरकार)
सदस्य, शेती सल्लागार समिती 1985 ते 1991
कार्यकारी अध्यक्ष, संसदीय व्यासपिठ 1985 ते 1986 (शेतकरी व्यासपिठ)
अध्यक्ष, संसदीय व्यासपिठ, 1986 ते 1991
सदस्य, अखिल भारतीय ऊस विकास मंडळ 1987 ते
सदस्य, दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या रेल्वेभोक्ता समिती 1988 ते 1990
सदस्य, हिंदी सल्लागार समिती (ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालय) 1987 ते 1989
सदस्य, संसदीय टेबलावर ठेवावयाची दस्तऐवज समिती 1987 ते 1991
सदस्य, शेती विद्यापीठ विश्लेषण समिती 1988
चेअरमन फर्टिलायझर प्रायसिंग समिती सन 1991 ते 1996
सदस्य, शेतकऱ्याच्यासाठी शेती अनुदान समिती (आखिल भारतीय काॅंग्रेस कमिटी) 1988-89
संस्थापक अध्यक्ष : किसान जागरण मंच
. सदस्य, सातारा जिल्हा काॅंग्रेस कमिटी, 1972
. अध्यक्ष, सातारा जिल्हा काॅंग्रस कमिटी 1980
. उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी 1986-87
. संस्थापक संचालक, किसनवीर सातारा सह. साखर कारखाना लि., भुईंज 1968-69
. अध्यक्ष, जनता शिक्षण संस्था, वाई सन 1979 ते 2021
अध्यक्ष, खंडाळा विभाग शिक्षण संस्था, खंडाळा सन 1979 ते 2023
. संचालक भूविकास बॅंक सातारा 1964-65 ते 1968-69
संस्थापक अध्यक्ष : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., खंडाळा
स्वागताध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, सातारा. 1990
मुख्य प्रवर्तक, यशवंतराव चव्हाण सहकारी सूतगिरणी खंडाळा
चेअरमन भारतीय कल्याण परिषद सन 1990 पासून
निमंत्रक, महाराष्ट्रातील संसद सदस्य 1989 ते 1991
चेअरमन नागरी व ग्रामिण विकास समिती, केंद्र सरकार नवी दिल्ली 1993 पासून
मध्यप्रदेशचे काँग्रेस पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी.
—_-
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, खंडाळा साखर कारखाना, जनता शिक्षण संस्था, धोम धरण, कण्हेर धरण आदी धरणांच्या उभारणीत योगदान. ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी विविध योजनांची सुरुवात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी वाई येथे मोफत वसतिगृहाची उभारणी. कुस्ती क्षेत्राला प्रोत्साहन, सामाजिक बांधिलकीतून उपेक्षितांसाठी विशेष कार्य.
कला, साहित्य, संगीत क्षेत्रात विशेष रुची आणि त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी स्नेह
अत्यंत सुसंस्कृत परंतु स्वाभिमानी नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित