देश/जग

दिल्लीच्या सीमापुरीत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

नवी दिल्ली : दिल्लीच्या ईशान्य भागातील सीमापुरी परिसरात बुधवारी दुपारी एक बहुमजली निवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, दिल्ली पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि अन्य बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

दुपारी साडेतीनच्या सुमारास सीमापुरीतील इदगाह मच्छी मंडी परिसरातील इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.

स्थानिक नागरिकांकडूनही बचावकार्य

इमारत कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली. काही नागरिकांनी ढिगारा हाताने हटवत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. बचावलेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका जखमी व्यक्तीला स्थानिक नागरिकाने घटनास्थळी सीपीआर दिल्याची माहितीही समोर आली आहे.

शाहदरा विभागाचे पोलीस उपायुक्त राजेंद्र प्रसाद मीणा यांच्या माहितीनुसार, काही जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी दोन ते तीन जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

भूकंपाच्या धक्क्यांनंतर इमारतीला तडे?

मंगळवारी रात्री उत्तराखंडमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले होते. या धक्क्यांनंतर इमारतीला तडे गेल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मात्र, इमारत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

परिसरातील वाहतूक प्रभावित

या दुर्घटनेमुळे सीमापुरी गोलचक्कर, डीएलएफ भोपूरा आणि आसपासच्या रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बचावकार्याला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी घटनास्थळापासून दूर राहावे, तेथे वाहने उभी करू नयेत तसेच अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन दिल्ली वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सत्य निकेतन दुर्घटनेनंतर महिनाभरात दुसरी घटना

सीमापुरीतील दुर्घटना दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर अवघ्या महिनाभरात घडली आहे. ६ सप्टेंबर रोजी सत्य निकेतन येथे बांधकाम/दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!