देश/जग

मिथुन चक्रवर्ती यांना मोठी जबाबदारी; पश्चिम बंगाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

कोलकाता : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांची पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती व सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पदाला त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू झाली असून, पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे. माहिती व सांस्कृतिक व्यवहार विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. ज्येष्ठ बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याशी संबंधित कार्यक्रमात सुवेंदू अधिकारी यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती.

भाजपचे स्टार प्रचारक

मिथुन चक्रवर्ती यांनी २०२१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पश्चिम बंगालमधील विविध निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. २०२६च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे सरकारमध्ये त्यांना देण्यात आलेली ही जबाबदारी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे.

चित्रपटसृष्टीशी संबंधित कामावर भर

मिथुन चक्रवर्ती यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे, जेव्हा पश्चिम बंगाल सरकारकडून राज्यातील चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यावर भर दिला जात आहे. न्यू टाउन येथे ‘उत्तम कुमार फिल्म सेंटर’ उभारण्याची योजनाही सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ अनुभव असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

मिथुन चक्रवर्ती यांची कारकीर्द पाच दशकांहून अधिक काळाची असून त्यांनी बंगाली तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय काम केले आहे. ‘मृगया’, ‘डिस्को डान्सर’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!