google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

डिसेंबरमध्येच होणार लोकसभा निवडणुका? : ममता बॅनर्जींचा दावा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (२८ ऑगस्ट) रोजी पक्षाच्या युवक मेळाव्याला संबोधित करत असताना भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा कदाचित याचवर्षीच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका घेऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडून देशभरात हेलिकॉप्टर्स बुक करण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच भाजपा जर तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशात हुकूमशाही लागू करेल, असा इशारा युवक मेळाव्यात बोलत असताना त्यांनी दिला.

जर भाजपा तिसऱ्यांदा सत्ते आल्यास देशात हुकूमशाहीचे शासन दिसेल. लोकसभेच्या निवडणुका यावर्षी डिसेंबर महिन्यात किंवा नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्या म्हणाल्या. भाजपाने आताच देशातील समाजासमाजामध्ये वैमनस्य निर्माण केले आहे, जर ते पुन्हा सत्तेवर आले तर आपला देश द्वेषावर आधारित राष्ट्र बनेल, असेही बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. भारतातील विद्यमान लोकसभेची मुदत २०२४ मध्ये संपत आहे. भाजपाने आतापासून देशभरातील हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवले आहेत. जेणेकरून निवडणुकीची घोषणा झाली तर इतर राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असा दावा बॅनर्जी यांनी केला.

राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांच्यावरी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी टीका केली. राज्यपाल संवैधानिक नियमांचा भंग करत असून त्यांच्या घटनेच्या विरोधातील कृत्यांना मी पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “लोकांनी निवडून दिलेल्या सरकारविरोधात ‘पंगा’ घेऊ नका”, असा इशाराच त्यांनी दिला.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, त्यांनी राज्यातील तीन दशकापासून असलेले कम्युनिस्ट पक्षाचे सरकार उलथवून लावले आणि आता त्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थी मृत्यूच्या प्रकरणानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपाच्यावतीने ‘गोली मारो’ घोषणा देण्यात आल्या, यावरही बॅनर्जी यांनी आक्षेप व्यक्त केला. अशाप्रकारच्या द्वेषपूर्ण घोषणा देणाऱ्यांना अटक करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. “ज्यांनी अशाप्रकारच्या घोषणा दिल्या, त्यांनी हे विसरू नये की, हा उत्तर प्रदेश नसून बंगाल आहे”, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!