स्वातंत्र्यदिनानिमित्त गोवा पोलिसांनी साजरा केला एकटं राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा ‘बर्थ डे’
पणजी:
स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्तर गोवा पोलिसांनी आज कौतुकास्पद काम केले. उत्तर गोवा पोलिस आणि 24×7 केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आणि हर घर तिरंगा मोहीम साजरी केली.
या उपक्रमांतर्गत वयोवृद्ध व्यक्तींच्या घरांना भेट देऊन त्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. तसेच, गोवा पोलिसांच्या विविध हेल्पलाईनचे नंबर देण्यात आले.
स्वातंत्र्य, एकता आणि करुणा या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यदिन निवडण्यात आला. एकटे राहणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. या लोकांसाठी प्रेमाचा संदेश म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधिन वाल्सन, इतर पोलीस कर्मचारी आणि 24×7 केअर फाउंडेशनच्या टीमने एकटे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्या घरी भेट देऊन त्यांचे वाढदिवस साजरे केले. तसेच, हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभक्ती आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणून राष्ट्र ध्वजांचे वाटप केले.
याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता त्यांना आशीर्वाद स्टिकर्स ज्यामध्ये आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकाचा समावेश आहे, त्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी वृद्धांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच, त्यांच्याशी संवाद देखील साधला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला.