
वीज दरात २०% वाढ; काँग्रेसची राज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका
पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस समितीने भाजप सरकारचा वीज दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय तीव्र शब्दात निषेध केला आहे. सायंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत वीज वापरावर २०% जादा आकारणी ही गोमंतकीय जनतेवरील उघडपणे लूटमार आहे. आधीच वाढलेल्या महागाईने, बेरोजगारीने आणि आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांवर हा आणखी एक प्रहार आहे.
या निर्णयाचा फटका घरगुती वापरकर्ते, विद्यार्थी, छोटे दुकानदार आणि उद्योगधंदे यांना थेट बसणार आहे. जनतेला दिलासा देण्याऐवजी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जनतेला आपल्या अपयशाची शिक्षा देण्याचा मार्ग निवडला आहे.
“स्वयंपूर्ण गोवा”चे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपने आज “दुःखी गोवा” निर्माण केला आहे. पेट्रोलपासून पाण्यापर्यंत आणि आता वीजदरांपर्यंत प्रत्येक मूलभूत गरजेवर हे सरकार जनतेची लूट करत आहे.
काँग्रेस पक्षाची मागणी आहे की सरकारने हा अत्याचारी व अन्यायकारक २०% वाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन उभे राहील. भाजप सरकारने गोमंतकीय जनतेकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहणे थांबवावे.

