‘सरकारी नोकऱ्यांसह गोव्यातील कलाकारांना प्रोत्साहन द्या’
मडगाव :
“कलाकारांची खाण” अशी नामना असलेल्या गोव्याने विश्वाला अनेक रत्ने दिली आहेत. सरकारने सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना राज्याच्या सांस्कृतिक धोरणानुसार ग्रेस मार्क्स द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावरील सुवर्णपदक विजेत्यांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे मी स्वागत करतो. सरकारने सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांनाही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोव्याने कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार विश्वाला भेट दिले आहेत. आम्ही संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, सादरीकरण कला अशा इतर विविध प्रकारांमध्ये कलारत्नांची निर्मिती केली आहे. ही समृद्ध परंपरा जपण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
काँग्रेस सरकारने आणलेल्या राज्य सांस्कृतिक धोरणाची अद्यापही कला आणि संस्कृती खात्याने पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही हे दुर्दैवी आहे. धोरणांतर्गत सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात यावेत, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून क्रीडापटूंसाठी जाहिर केलेली सरकारी नोकऱ्या देण्याची योजना सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्यांनाही देण्याची विनंती करणार आहे, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
कला आणि संस्कृती खात्याने नियुक्त केलेल्या संगीत आणि नृत्य प्रशिक्षकांना मूल्यमापन आधारित बढती देण्यात याव्यात ज्यामुळे त्यांना चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आणि विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात मदत होईल. सध्याच्या नियमांनुसार, संगीत आणि नृत्य प्रशिक्षक कोणत्याही प्रमोशनसाठी पात्र नाहीत, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.