जूनच्या सुरवातीच्या दिवसात ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवार-शनिवार पासून गोव्यात गती पकडली आहे. गोव्यात आगामी पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे.
शनिवार 24 जून ते 28 जून या काळात उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गोवा वेधशाळेने राज्यात तीन दिवस ऑरेंज तर दोन दिवस यलो अलर्टचा इशारा दिला आहे
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
जोरदार वारे आणि खवळलेला समुद्र यामुळे पर्यटकांना समुद्रात प्रवेश देऊ नये, तसेच मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक आणि उत्तर केरळच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर असणार आहे.
शनिवार ते मंगळवार या काळात राज्यात काही ठिकाणी 64.4 मिलीमीटरहून अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने म्हटले आहे की, पावसासह सुमारे 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.
मंगळवारपर्यंत दक्षिण महाराष्ट्र ते गोवा किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचा वेग 40-45 किलोमीटर ते 55 किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
IMD ने असुरक्षित झाडांबाबत, तसेच भूस्खलन आणि धोकादायक इमारतींबाबतही इशारा दिला आहे. अशा ठिकाणांपासून सावध राहावे, पूर आलेल्या भागात वाहने चालवताना काळजी घ्यावी, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही नागरिकांना सूचित केले आहे.