‘इथे’ भरली देशातील पहिलीवहिली
युनिफाइड बीच क्रिकेट स्पर्धा
पणजी :
संपूर्ण देशाची उत्सुकता लागून असलेला आणि ६ जानेवारीपासून सुरू होत असलेला वैविध्यतेचा सोहळा पर्पल फेस्ट या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज स्पेशल ऑलिम्पिक्स भारतच्यावतीने आयोजित भारतातील पहिलीवहिली युनिफाइड बीच क्रिकेट स्पर्धेस मिरामार किनाऱ्यावर शानदान सुरूवात झाली.
गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते तसेच साळगावचे आमदार केदार नाईक, विकलांक व्यक्तींसाठीचे राज्य आय़ुक्त गुरुप्रसाद पावसकर, पणजी महापालिकेचे नगराध्यक्ष रोहित मोन्सेरात, विकलांक व्यक्तींसाठीच्या राज्य आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाझिक, समाजकल्याण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती संध्या कामत, राष्ट्रीय क्रीडा संचालक तसेच स्पेशल ऑलिम्पिक्स भारतचे आर. वाझ यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, “पर्पल फेस्ट हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी व संस्मरणीय ठरण्यासाठी समाजकल्याण खात्याचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि स्वयंसेवक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. विकलांग व्यक्तींनाही सन्मान मिळाला पाहिजे, त्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे यासाठी कोणीतरी हे आव्हान स्वीकारले पाहिजे आणि पुढे आले पाहिजे.”
मंत्री पुढे म्हणाले, “विकलांग व्यक्तींसाठी शिक्षण-प्रशिक्षण देऊन त्यांना क्रीडा, मनोरंजना, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रांमध्ये रोजगार संधी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने विकलांग व्यक्तींसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. सर्वांच्याच आवडीचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. त्यामुळे विकलांग व्यक्तींसाठी सुद्धा क्रिकेट सामने खेळवले गेले पाहिजेत. याच उद्देशाने व्हिक्टर वाझ यांनी गोव्यातून या क्रीडाउपक्रमाचे बीज रोवले आहे आणि लवकरच हा क्रीडाप्रकारही भारतात सर्वत्र खेळला जाईल.”
साळगावचे आमदार केदार नाईक म्हणाले, “ई-रिक्षा, व्हील चेअर सुविधांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. प्रत्येक विकलांग मुलाला मदत करण्याचे त्यांचा आदर राखण्यासाठी आम्हाला सर्वांची मदत हवी आहे आणि हा उपक्रम यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.”
विकलांग व्यक्तींसाठीचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “सर्वांना एकत्र आणायचे असेल तर क्रिकेटशिवाय दुसरा लोकप्रिय खेळ नाही. छोटी छोटी विकलांग मुले एकत्र येऊन खेळताना-बागडताना पाहून, आनंद साजरा करताना पाहणे हा आनंद अवर्णनीय आहे. प्रत्येकाने या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहावा. युनिफाइड बीच क्रिकेटच्या माध्यमातून आज अनेकांनी या मुलांच्या मैदानावरील कौशल्याची प्रशंसा केली.”
विकलांग व्यक्तींसाठीच्या राज्य आयोगाचे सचिव ताहा हाझिक यांनीही विचार मांडले.