IPL final: गुजरात टायगरच्या साई सुदर्शनचा जलवा
अहमाबाद :
IPL Final 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर गुजरात संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 214 धावा केल्या. यादरम्यान 21 वर्षीय स्टार खेळाडू साई सुदर्शनची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. साईने CSK च्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने 33 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल मोसमातील साई सुदर्शनचे हे तिसरे अर्धशतक आहे. साईने आयपीएल फायनलमध्ये 47 चेंडूत 96 धावांची तूफानी खेळी खेळली. त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 204.25 होता. सुदर्शनशिवाय ऋद्धिमान साहाने 54 तर शुभमन गिलने 39 धावा केल्या. चेन्नईकडून मथिशा पथिरानाने 2 बळी घेतले.
साई सुदर्शन फायनलमध्ये शतक झळकावण्यापासून हुकला असला तरी आपल्या वेगवान खेळीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. IPL फायनलमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा सुदर्शन हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे वय 21 वर्षे 226 दिवस आहे. सध्या हा विक्रम मनन वोहराच्या नावावर आहे, ज्याने 2014 च्या फायनलमध्ये पंजाबसाठी अर्धशतक झळकावले होते. तेव्हा त्याचे वय 20 वर्षे 318 दिवस होते.