‘चित्रपट निर्मितीच्या प्रक्रीयेभोवती असलेले गूढ वलय भेदायला हवे’
“व्यावहारिक आणि सृजनशीलतेवरील निर्बंध कल्पना निर्मिती वरील आपल्या विश्वासाला मारक ठरतात, आणि आपल्या अनेक कथा जन्माला येण्यापूर्वीच कोमेजून जातात. भारत हे असे ठिकाण आहे, जिथे कथांची भ्रूणहत्या घडते.” गोव्यामध्ये इफ्फी (IFFI) 2024 महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या ‘स्क्रिप्टपासून स्क्रीनपर्यंतचा प्रवास: चित्रपट आणि त्या पलीकडील लेखन’ या विषयावरील मास्टर क्लासला मार्गदर्शन करताना ख्यातनाम लेखक आणि कवी प्रसून जोशी, बोलत होते. कला अभिव्यक्तीच्या सातत्त्यपूर्ण सरावाला पर्याय नाही, कारण जेव्हा संधी आपले दार ठोठावते, त्यावेळी सराव सुरु करता येत नाही, असे ते यावेळी म्हणाले.
“खरा आशय हा भाषेच्या बंधनात अडकत नाही, आणि म्हणूनच असे म्हणायला हवे, की सर्वोत्कृष्ट काव्य निःशब्दतेमधून जन्माला येते, आणि हाच निःशब्द शाश्वत ध्वनी आपल्याला एकमेकांशी जोडतो. मौन हीच अंतिम भाषा आहे.” प्रसून जोशी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, चित्रपट निर्मिती प्रक्रिये भोवती असलेले गूढ वलय आपण भेदायला हवे. चित्रपट गूढ रम्य असू शकतो, मात्र त्याची प्रक्रिया तशी नसते.चित्रपटा मागची विचार प्रक्रिया उलगडताना, प्रसून जोशी यांनी आपल्या बालपणातील घटनांना उजाळा दिला. तारे जमीन पर चित्रपटातील त्यांच्या गीतांसाठी ते प्रेरणास्थान होते असे ते म्हणाले.जेंव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मांडता, तेव्हा ती सर्वांपर्यंत पोहोचते,” ते पुढे म्हणाले.
“माझी आई माझ्या कवितेतील कठीण शब्दांच्या वापरावर भाष्य करत असे, त्यामुळे माझ्या कविता लेखन प्रक्रियेला योग्य आकार दिला गेला आणि मग माझ्या लक्षात आले, या लेखनाने केवळ मला समाधान मिळणार नाही तर मला वाचकांना आवडेल असा मजकूर लिहिता आला पाहिजे, तसा मी तो लिहू लागलो.
सर्जनशील क्षेत्रावरील ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेच्या प्रभावाबद्दल बोलताना, गीतकार प्रसून जोशी म्हणाले की , “मी कृत्रिम बुद्धिमत्ता हलक्यात किंवा किरकोळीत घेत नाही. वास्तविक जिथे सर्जनशीलता आहे, त्या क्षेत्राला अगदी सर्वात शेवटी एआय चा प्रवेश होईल, असे वाटले होते. परंतु कृत्रिम प्रज्ञेचा सर्वात आधी सर्जनशील क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. मात्र आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की गणितासारख्या कोणत्याही विषयावर, क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे वर्चस्व प्राप्त केले जाऊ शकते. तथापि, जर एखाद्याची कविता किंवा कथा ही अंतिम सत्यातून उदयास आली असेल तर ती साहित्यकृती एआय तयार करू शकणार नाही. एआय प्रबळ होत असल्याने त्याचा परिणाम निर्मात्यावर होत आहे, निर्मितीवर नाही, असेही सीबीएफसीच्या अध्यक्षांनी नमूद केले.
कथाकथन केवळ काही शहरांपुरतेच केंद्रीकृत, मर्यादित राहून चालणार नाही. हे पाहावे लागेल आणि ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ (सीएमओटी) हा उपक्रम प्रादेशिक, ग्रामीण भागातील कथाकारांना उदयास येण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करून या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आहे, असे प्रसून जोशी यांनी सांगितले. जोपर्यंत चित्रपट निर्माते लहान शहरांच्या ठिकाणाहून उदयास येत नाहीत तोपर्यंत आम्ही लहान शहरे आणि शहरांमधील कथा प्रभावीपणे सांगू शकत नाही. जर तुम्हाला भारतातील खऱ्या, अस्सल कथा बाहेर काढायच्या असतील तर तुम्हाला चित्रपट निर्मिती देशाच्या दूरवर, अगदी कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवायला हवी, असा निष्कर्ष त्यांनी काढला.
या मास्टरक्लासचे सूत्रसंचालन अनंत विजय यांनी केले.