
शाळेत जाण्यापूर्वीच ’ती’ झाली ‘डिमॅट बेबी’
दोन वर्षांच्या इयाराच्या नावे १४ आर्थिक-शासकीय नोंदी
पुणे : जमादार कुटुंबात तब्बल ५५ वर्षांनंतर जन्मलेल्या दोन वर्षीय इयारा आसीम जमादार हिच्या नावे विविध आर्थिक व शासकीय योजनांमध्ये नोंदणी करून कुटुंबाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. इयाराच्या आजी, आई आणि वडिलांनी मिळून पुणे जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे बचत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि आवर्ती ठेव (आरडी) यांसह सात सरकारी खाती उघडली असून, अवघ्या ४८ तासांत तिच्या नावे एकूण १४ आर्थिक व शासकीय व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
इयाराच्या नावे सुकन्या समृद्धी योजना, आभा हेल्थ कार्ड, डिमॅट खाते, म्युच्युअल फंड गुंतवणूक, पोस्ट बचत खाते, पीपीएफ आणि आरडी खाते सुरू करण्यात आले आहे. वयाच्या दुसऱ्या महिन्यातच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यात आले होते, तर ११व्या महिन्यात म्युच्युअल फंडातील एसआयपी सुरू करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
१३ जून रोजी इयाराची आजी अकीला अस्लम जमादार आणि आई आलिया आसीम जमादार यांनीही प्रत्येकी दोन खाती उघडली. त्यामुळे एकाच दिवशी, एकाच शाखेत, एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी मिळून पाच खाती सुरू केल्याची नोंद झाली. या प्रक्रियेत जीपीओचे वरिष्ठ अधिकारी अशोक खेडकर यांचे सहकार्य लाभल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
जमादार कुटुंबाने आर्थिक साक्षरता, केवायसी पूर्तता, आरोग्य विमा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे स्पष्ट केले. अल्पसंख्याक समाजामध्ये शासकीय कागदपत्रे, आर्थिक नियोजन आणि करप्रणालीबाबत जागरूकता वाढावी, हा त्यामागील उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अल्पसंख्यांक शैक्षणिक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष अस्लम जमादार यांनी सांगितले की, इयाराच्या वाढदिवसानिमित्त ‘यंगेस्ट फायनान्शियल मल्टिटास्कर ऑफ इंडिया’ तसेच ‘थ्री जनरेशन सिंगल डे अकाउंट ओपनिंग अॅट जीपीओ पुणे’ या विक्रमांसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडे अर्ज सादर करण्यात येणार आहे.

