महाबळेश्वर, पाचगणीतील अवैध बांधकामांना प्रशासनाचा दणका
बेकायदेशीर बांधकामे पाडा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
सातारा (महेश पवार) :
महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील अवैध बांधकामांचे पाणी व वीज कनेक्शन तोडा तसेच बेकायदेशीर बांधकामे तोडा असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदार सपना चौधरी यांना दिले आहेत.
महाबळेश्वर, पाचगणी व भिलार परिसरात नियमबाह्य बांधकामे सुरु असून प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तात्काळ दखल घेवून अवैध बांधकामांना दणका दिला आहे. अवैध बांधकामांचे पाणी व वीज कनेक्शन तसेच सर्वच बेकायदेशीर बांधकामे तात्काळ तोडा असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असलेल्या संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात अवैध बांधकामांच्या ठिकाणी पाणी व वीज कनेक्शन दिली जाताहेत ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. महाबळेश्वरच्या तहसिलदार सपना चौधरी यांना यासंदर्भात विचारले असता आदेश प्राप्त झाला असून अवैध बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.