Home

थलपती ते जननायकन…

– किशोर अर्जुन
केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू या राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आणि आसाम, पुद्दुचेरी आणि काही प्रमाणात केरळचा अपवाद वगळता अन्य दोन्ही राज्यांनी अत्यंत अनपेक्षित असा निकाल देत सगळ्याच गृहीतकांना धक्का दिला आहे. त्यातही तमिळनाडूचा निकाल हा अनेक अंगानी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारण हा निकाल फक्त तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात सत्तांतर घडवताना दिसत नाहीत तर, त्या तमिळ समाजाच्या बदलत्या मानसिकतेची जाहीर नोंद घ्यायला लावत आहेत. ‘हो-नाही-हो’ असे म्हणत तमिळ सिनेमाचा सुपरस्टार ‘थलपती’ विजयने अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘तमिळगा वेट्री कळघम’ अर्थात ‘टीव्हीके’वर तमिळ मक्कलने कमालीचा विश्वास टाकत तब्बल १०८ आमदार निवडून दिले आहेत, आणि सत्तेच्या सोपानापर्यंत नेऊन ठेवले आहे. आणि त्याच बरोबर गेल्या अर्ध शतकापासून तमिळनाडूच्या जनमानसावर आणि अर्थातच राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या द्रविड द्विपक्षीय व्यवस्थेच्या स्थैर्यालाच मोठे आव्हान दिलेले आहे.
‘पुराची थलैवर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमजीआर यांनी थेट सिनेमाच्या पडद्यावरून  तामिळनाडूमध्ये  मुख्यमंत्रीपदावर झेप घेतली होती. पण विजयप्रमाणे त्यांचा राजकीय प्रवेश अचानक अर्थातच झालेला नव्हता. अर्थात, गेल्या काही वर्षांपासून विजय जरी राजकीय घटना आणि घडामोडींनी प्रेरित होऊन आपले स्थान आणि अस्तित्व राजकीय पटलावर दाखवून देत होताच, अशावेळी एमजीआर हे मात्र सुरुवातीपासूनच तमिळनाडूच्या वैचारिक – राजकीय- कलात्मक भूमिकेप्रमाणे पहिल्या-दुसऱ्या सिनेमापासूनच आपल्या द्रविडीयन राजकीय मतांसोबत ठामपणे उभे होते. अण्णादुराई यांच्याकडे पाहत आणि ‘पेरियार’ रामस्वामी यांच्या विचारावर चालत, आपला वैचारिक मित्र आणि जिवाभावाचा सखा करुणानिधी यांच्यासोबत एमजीआर यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. आणि पुढे करुणानिधी यांच्या ‘द्रमुक’ पक्षाविऱोधात द्रविडी विचारांचा नवा पक्ष ‘अण्णा द्रमुक’ स्थापन करत सत्ता प्राप्त केली होती. विजयचा राजकीय प्रवास काठाकाठाने साधारणतः असाच असल्याचे आपल्याला दिसते. कारण ‘द्रमुक’ हा आपला राजकीय विरोधक आहे, असे जरी विजयने वारंवार सांगितले असले तरी, गेल्या काही वर्षात एका टप्प्यावर विजयच्या फॅन क्लबने जयललिता यांच्या ‘अण्णा द्रमुक’ने केलेल्या राजकीय फसवणुकीचा बदला म्हणून वेळोवेळी स्टालिन यांच्या ‘द्रमुक’ला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. पण सत्तेवर असलेल्या द्रमुकच्या निशाणा केल्याशिवाय आपण सत्तेच्या परिघापर्यंत पोहोचणार नाही, याची जाणीव झाल्यानेच विजयने गेल्या काही वर्षात आपली राजकीय भूमिका तीक्ष्ण करत राज्यात द्रमुक हा राजकीय विरोधक तर केंद्रात भाजप हा वैचारीक विरोधक म्हणून घोषित केले. या दोन्ही विधानांचा त्याला या निवडणुकीत किती मोठा फायदा झाला ते आता सगळ्यांसमोरच आहे.
marathi-article-on-chandrasekaran-joseph-vijay-tamilnadu-cm
जेन झी आणि द्रविड अस्मिता :
गेल्या अर्ध शतकापासून तमिळनाडूचे राजकारण ‘द्रमुक’ आणि ‘अण्णाद्रमुक’ या दोन ध्रुवांभोवतीच फिरत आले आहे. अण्णा दुराई, पेरियार रामसामी, करुणानिधी, एमजीआर आणि जयललिता या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या निधनानंतरदेखील द्रविड चळवळीने निर्माण केलेली भावनिक आणि वैचारिक पायाभूत रचना तमिळ जनतेच्या मनात रुजलेली आहे. भाषा, सामाजिक न्याय, संघराज्यवाद, कल्याणकारी राज्यव्यवस्था आणि प्रादेशिक अस्मिता या प्रश्नांवर उभे राहिलेले हे राजकारण तमिळनाडूच्या सामाजिक जीवनात इतके एकरूप झाले होते, कि राज्यात तिसऱ्या राजकीय पर्यायाची कल्पना देखील बराच काळ अवास्तव मानली जात होती. त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर विजयचा उदय हा त्या गृहितकाला पहिला मोठा धक्का ठरला आहे.
 
कारण विजयला (पक्षी : टीव्हीकेला)  मिळालेली एकूण मते पाहिली तर, असे दिसते कि राज्यातील शहरी आणि निमशहरी भागांमध्ये लक्षवेधी प्रतिसाद मिळाला आहे. चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई, तिरुपूर, त्रिची आणि कावेरी खोऱ्यातील कित्येक मतदारसंघांमध्ये प्रथमच मतदान करणारे युवक, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबे, असंघटित क्षेत्रातील कामगार, आणि सरकारी योजनांवर अवलंबून असलेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात विजयला झुकते माप दिल्याचे दिसून येते. तमिळनाडूचा जीडीपी देशात सर्वाधिक असले तरी, गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारी, शिक्षण, ‘नीट’ परीक्षा, आणि मुख्य म्हणजे राजकीय घराणेशाही यांविषयी वाढणारी अस्वस्थता राज्यात सतत दिसत होती. विजयने याच भावनांना आपल्या प्रचाराचा केंद्रबिंदू बनवले. त्यामुळेच त्याला ‘जेन झी’ आणि ‘जेन मिलेनियम’ने मोठ्या प्रमाणात हात दिला आहे. गेल्या काही वर्षात सुशिक्षित ‘जेन झी’ने जगात ठिकठिकाणी आपल्या उद्रेकाला वाट करून देत राजकीय सत्तांतर घडवून आणलेले आहे. आपल्या देशाच्या शेजारी असलेल्या नेपाळचे उदाहरण तर जवळचे आणि ताजे आहे. अशावेळी विजयला मिळालेले यश हे फक्त त्याच्या पडद्यावरील  प्रतिमेला नाही, ‘जेन झी’ तरुण मतदारांच्या निराशेला, डिजिटल पिढीच्या तुटलेल्या राजकीय विश्वासाला, आणि ‘नवीन पण परिचित चेहरा’ शोधणाऱ्या मतदारांच्या भावनिकतेला घातलेल्या सादेला प्रतिसाद म्हणून हे सगळे पाहिले पाहिजे.
विजयच्या सगळ्या प्रचारसभांमध्ये  काही बाबी फार विचारपूर्वक आलेल्या दिसतात. त्याने कधीच आक्रमक राष्ट्रवाद किंवा धार्मिक ध्रुवीकरणावर भर दिलेला नाही, तर साधारणतः दक्षिण भारतीय राजकारणाची जी इतक्या वर्षांची बसवलेली वैचारिक घडी आहे त्यानुसार, उत्तम शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचारविरोध, प्रशासकीय पारदर्शकता, संघराज्यवाद आणि प्रादेशिक (इथे तमिळ) अस्मिता यांवर भर देणारी भाषा वापरली. आणि त्याचवेळी ”सत्तेचे राजकारण; करण्यासाठी नाही तर ‘लोकांचे प्रशासन’ करण्यासाठी आपल्याला सत्ता द्या,’ असे आवाहन जनतेला केले.
 marathi-article-on-chandrasekaran-joseph-vijay-tamilnadu-cm
सिनेमा हेच राजकारण :
अन्य राज्यांप्रमाणे तामिळनाडू मध्ये सिनेमा फक्त ‘मनोरंजन उद्योग’ कधीच नव्हता. सुरुवातीपासूनच सिनेमाने विचारधारेचा वाहक म्हणून काम केले आहे. लोकांपर्यत द्रविड विचार पोहोचवण्यासाठी तत्कालीन नेत्यांनी गाव-खेड्यापर्यंत सिनेमा पोहोचवला. सिनेमा म्हणजे एकूणच जनमत निर्मितीचे माध्यम, सामाजिक चळवळींचा विस्तार मानले गेले. देशातील साम्यवादी विचारांच्या लोकांपुर्वीच दक्षिणेत द्रविड चळवळीने खूप आधीच पडद्यावरील प्रतिमेची ताकद ओळखली होती. अण्णादुराई आणि करुणानिधी यांनी पटकथांमधून जातीय विषमता, भाषिक स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि वर्णवर्चस्ववादविरोधी विचार सामान्य लोकांपर्यत पोहोचवले. ‘पराशक्ती’सारख्या सिनेमांनी तमिळ समाजाला केवळ भावनिक अनुभव दिला नाही… त्यांनी राजकीय चेतना दिली. (आणि २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नव्या ‘पराशक्ती’ सिनेमाने राज्यातील हिंदी विरोधी चळवळीचा इतिहास पुन्हा अधोरेखित केला.)
पुढे एमजीआर यांनी या सगळ्याचे रूपांतर एका नवीन प्रकारच्या लोकनेतृत्वात केले. पडद्यावर गरीबांचे रक्षण करणारा नायक आणि निवडणूक प्रचारातील नेता यांच्यामधील भिंत त्यांनी जवळजवळ पूर्णपणे पाडून टाकली. लोकांनी सिनेमागृहात ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीवर मतदान केंद्रात देखील विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. जयललितांनी या भावनिक वारशाला संघटनात्मक ताकदीची जोड दिली. त्यामुळे विजय हा या सगळ्याला अपवाद नाही. तो तमिळ राजकीय संस्कृतीतील जुन्या परंपरेचा नवा पाईक ठरला आहे.
 
पण… : 
पडद्यावरील करिष्मा प्रशासन चालवण्यासाठी पुरेसा असतो का? कारण निवडणूक जिंकणे आणि राज्य चालवणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तमिळनाडू हे भारतातील सर्वाधिक प्रशासकीयदृष्ट्या विकसित राज्यांपैकी एक आहे. प्रचंड कल्याणकारी यंत्रणा, गुंतागुंतीची औद्योगिक व्यवस्था, वेगाने वाढणाऱ्या शहरामुळे पायाभूत सुविधांवरील वाढणारे  दबाव, मोठे सार्वजनिक आरोग्य नेटवर्क, उत्तम शिक्षण व्यवस्था आणि एका वैचारिक साच्यातून तयार झालेली पिढ्यानपिढ्यांची नोकरशाही… या सगळ्याचे व्यवस्थापन करणे हे केवळ लोकप्रियतेच्या जोरावर शक्य नाही. त्यामुळे उद्या विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासमोरील पहिली मोठी परीक्षा मंत्रिमंडळ निर्मितीची असेल. कारण करिष्म्यावर उभ्या राहिलेल्या पक्षांमध्ये अनेकदा अनुभवी प्रशासकीय नेतृत्वाची कमतरता असते. पडद्यावरील ‘एकट्याने सगळे बदलणारा नायक’ आणि लोकशाहीतील सामूहिक निर्णयप्रक्रिया यांच्यामध्ये मूलभूत फरक असतो. जर सर्व निर्णय नेतृत्वाच्या प्रतिमेभोवती केंद्रीत झाले, तर प्रशासकीय निष्क्रियता निर्माण होण्याचा धोका नक्कीच तयार होऊ शकतो.
 
त्याचवेळी विजयने या निवडणूक प्रचारसभेत मोठ्या प्रमाणात आश्वासने दिली आहेत, आता सत्ता आल्यामुळे ती पूर्ण कशी करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. महिला कुटुंबप्रमुखांना आर्थिक सहाय्य, रोजगार निर्मिती, सार्वजनिक आरोग्याचा विस्तार, अनुदानित गृहनिर्माण, औद्योगिक कॉरिडॉर्स, शैक्षणिक सुधारणा… ही सगळी आश्वासने लोकप्रिय नक्कीच आहेत. पण त्यासाठी लागणारी आर्थिक शिस्त आणि महसुली नियोजन अधिक कठीण आहे. तामिळनाडूवर सध्या ९.५२ लाख कोटीचे कर्ज आहे. त्यामुळे आश्वासनांची पूर्ती करण्यासाठीचा पैसे आणि एकूणच राज्य चालवण्यासाठी, साधनसुविधेसाठी पैसा यांच्यात  संतुलन राखणे हे विजयसमोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक ठरणार आहे.
 
काय आहे उद्याच्या उदरात…? :
निवडणूक निकालादिवशी त्याने द्रमुक प्रमुख स्टालिन यांच्यावर टीका केलीच होती, पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टिप्पणी करत, आपले स्वप्न फक्त तामिळनाडू पर्यंतच मर्यादित नसल्याचेच अप्रत्यक्षरीत्या दाखवून दिले आहे. पण त्याच्या या उद्याच्या स्वप्नांसाठी सगळ्यात महत्वाची बाब असणार आहे ती म्हणजे, ‘टीव्हीके’ एक सर्वार्थाने संघटित राजकीय पक्ष बनेल… कि फक्त एका गाजलेल्या कलाकाराभोवती फिरणारी भावनिक चळवळ राहील? विजय स्वतःला पडद्यावरील ‘थलपती’ मानसिकतेतून बाहेर काढून लोकशाहीतून नेतृत्व करू इच्छिणारा ‘लोकनायकन’ बनू शकेल का? हा खरा प्रश्न आहे. कारण तमिळनाडूने याआधी देखील कलाकारांना सत्तेपर्यत पोहोचवले देखील आहे आणि पुढीलवेळी  त्यांना तितक्याच कठोरपणे नाकारले देखील आहे. विजयकांतपासून कमल हासनपर्यंत कित्येक उदाहरणे राज्याने पाहिली आहेत. त्यामुळे पुढील किमान दोन वर्षे विजयासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. जर विजयने ‘टीव्हीके’ला वैचारिक स्पष्टता दिली, सक्षम प्रशासक आपल्या सभोवताली उभे केले, राज्याचे आर्थिक संतुलन राखले, आणि लोकानुनयाच्या पलीकडे जाऊन संस्थात्मक शासन उभारले… तर तो तमिळनाडूच नाही तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे देशातदेखील आपला विचार-विस्तार करण्याचा महत्वाकांक्षा पूर्ण करू शकतो. अन्यथा, हा विजय केवळ एका अस्वस्थ काळातील भावनिक उद्रेक म्हणून लोकांच्या आठवणीत राहील…
कारण, सिनेमागृहातील टाळ्या, शिट्या कदाचित अभिनेत्याला ‘नेता’ करण्यासाठी पूरक  होऊ शकतात, पण फक्त त्याने नेतेपद मिळवल्यानंतर प्रशासन कसे राबवले हीच बाब त्याला इतिहासामध्ये टिकवून ठेवू शकते.
marathi-article-on-chandrasekaran-joseph-vijay-tamilnadu-cm

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!