
‘जुन्या गोव्यात मॉल नाही’
गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने आज सार्वजनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि केंद्रीय योजना प्रशाद (तीर्थक्षेत्र पुनरुत्थान आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम) अंतर्गत जुने गोवे येथे सुरू असलेल्या विकास प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेत पर्यटन संचालक केदार नाईक; डॉ. किशोर रघुबन्स, सहायक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, एएसआय; डॉ. एम. पी. बालन, कार्यकारी अभियंता (उत्तर), प्रकल्प कक्ष, एसपीव्ही, जीटीडीसी आणि इतर उपस्थित होते.
*पत्रकार परिषदेत, पर्यटन संचालक केदार नाईक यांनी स्पष्ट केले* की या परिसरात एकही मॉल बांधला जात नाही. हा प्रकल्प पूर्णत: अभ्यागतांच्या सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. ज्यामध्ये पार्किंग क्षेत्र, माहिती केंद्र आणि या वास्तूसाठी सुधारित प्रकाशयोजना यांचा समावेश आहे. उप वनसंरक्षक, उत्तर गोवा विभाग यांच्या कार्यालयासह नगर नियोजन खाते (टीसीपी) आणि राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण (एनएमए) यांच्याकडून सर्व आवश्यक परवानग्या योग्यरित्या प्राप्त झाल्या असून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांनुसारच हे काम सुरू झाले आहे. सध्या केवळ जागा मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचायतीकडून एनओसीसाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. याठिकाणी कोणतेही बांधकाम सुरू होण्यापूर्वी आवश्यक सर्व परवानग्या घेतल्या जातील.
या प्रकल्पातील सामुदायिक सहभागावर प्रकाश टाकताना, नाईक यांनी सांगितले, की पर्यटन खात्याने सर्व भागधारकांशी संवाद साधला आहे, त्यांचा अभिप्राय समाविष्ट करून विश्वास संपादन केला आहे. मात्र, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (एएसआय) निर्देशांनंतर, सदर काम तात्पुरते थांबवण्यात आले असून एएसआयकडून मंजुरी मिळाल्यानंतर, काम पुन्हा सुरू केले जाणार आहे.
एएसआयच्या वतीने बोलताना, सहाय्यक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, डॉ. किशोर रघुबन्स म्हणाले, की “याठिकाणी उत्खनन प्रक्रिये दरम्यान, तोफगोळे सापडले होते. परिणामी, एएसआयने पर्यटन खात्याला फोटोग्राफी, रेखाचित्रे आणि अहवालांद्वारे योग्य दस्तऐवज तयार करण्यास परवानगी देण्यासाठी काम थांबवण्याची सूचना केली आहे. या प्रक्रियेला थोडा वेळ लागणे अपेक्षित आहे.”
या परिसराचे वारसा महत्त्व जपत, अभ्यागतांना चांगला अनुभव देण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. प्रमुख गोष्टींमध्ये पार्किंगसाठी बांधकाम, एक समर्पित पर्यटन सुविधा केंद्र आणि पार्किंग क्षेत्रात पथदिवे असलेली बाह्य प्रकाश व्यवस्था यांचा समावेश आहे. या उपक्रमात वास्तूच्या दर्शनी भागावर रोषणाई, पर्यटकांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी ई-ऑटो सेवा, आरामदायी आसन व्यवस्था आणि चांगले फिरता यावे यासाठी सुधारित वाहतूक चिन्हे यांचा देखील समावेश आहे.