भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे.
नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो फाऊल गेले पण त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये ८९ मी चा टप्पा गाठला आणि अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तानचा अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आला आहे. तर तिसरा क्रमांक ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटरसह मिळवला.
नीरजने यंदाच्या मोसमातील ८९.४५ हा सर्वाेत्कृष्ट थ्रो केला आहे. या सर्वाेत्कृष्ट थ्रोसह त्याने रौप्यपदकासह त्याचं दुसरं ऑलिम्पिक पदक मिळवलं आहे. अशाप्रकारे नीरज चोप्रा ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक ८९.४५ मीटर भालाफेक केली, तर अर्शद नदीमने ९२.९७ मीटरसह ऑलिम्पिक विक्रम केला. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते, तर त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर आहे, जी त्याने २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकून मिळवली होती. मात्र दोन मीटर अधिक फेक करून त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.