
‘कोंबा, मडगाव येथील सांडपाणी प्रदूषणाची तातडीने पाहणी करा’
मडगाव – मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी आरोग्य व नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांना शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमासाठी मडगाव भेटीदरम्यान कोंबा येथील सांडपाण्याच्या समस्येची स्वतः पाहणी करण्याची विनंती केली आहे.
मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात प्रभव नायक यांनी कोंबा-मडगाव येथे वारंवार होणाऱ्या सांडपाण्याच्या गळतीमुळे निर्माण झालेल्या गंभीर सार्वजनिक आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधले आहे. या गळतीमुळे परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाल्याची भीती असून, अनेक रहिवाशांनी विहिरींचे पाणी वापरणे बंद केल्याचे समोर आले आहे. यामुळे स्थानिक कुटुंबांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या विहिरींना स्थानिकांच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष महत्त्व आहे. विहिरीतील पाणी पवित्र मानले जाते आणि काही कुटुंबांकडून सदर विहिरीत श्री गणेश विसर्जन केले जातो. विहिरींचे पाणी वापरता येत नसल्यामुळे दैनंदिन घरगुती गरजा, बागकाम आणि इतर कामांसाठी रहिवाशांना अतिरिक्त खर्च करावा लागत असून, त्यांची गैरसोय होत असल्याचे प्रभव नायक यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कोंबा येथील रिंग रोडच्या बाजूस असलेल्या नाल्यात सांडपाणी वाहत असून, हा नाला पुढे साळ नदीला जाऊन मिळतो. अनेक पावसाळी गटारे सांडपाण्याने भरलेली असल्याचेही निदर्शनास आले आहे. या सांडपाण्याचा नेमका स्रोत अद्याप स्पष्ट झालेला नसल्यामुळे परिसरात अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली असून, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला संभाव्य धोका निर्माण झाला आहे.
प्रभव नायक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बाधित विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे, पावसाळी गटारांमध्ये सांडपाणी सोडले जाण्याचा स्रोत शोधण्याचे आणि तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. ही कार्यवाही गोवा सिवरेज अँड इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, मडगाव नगरपालिका आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या समन्वयाने करण्यात यावी, असेही त्यांनी सुचवले आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, निश्चित कालमर्यादेत कृती आराखडा तयार करावा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली आहे. तसेच, मडगाव भेटीदरम्यान मंत्र्यांनी बाधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून मडगावच्या जनतेचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






