
गायक मूसवाला हत्येप्रकरणी सहा जण ताब्यात
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी डेहराडूनमधून सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस पंजाबला रवाना झाले आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी मूसेवाला यांची हत्या झाल्यापासून पंजाब पोलीस आरोपीचा शोध घेत होते. सोमवारी डेहराडूनच्या नया गाव चौकीजवळ पंजाब पोलिसांनी उत्तराखंड एसटीएफच्या मदतीने सहा जणांना अटक केली. त्यांच्यापैकी एकाचा मुसेवाला यांच्या हत्येत सहभाग असल्याचा पंजाब पोलिसांना संशय आहे.
सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस मानसातील कांचिया भागातील मनसुख वैष्णो ढाब्यावर पोहोचले. ढाब्यावर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा स्कॅन करण्यात आला. 29 मे रोजी सीसीटीव्हीमध्ये काही मुले ढाब्यावर जेवण करताना दिसली. पंजाब पोलिसांनी सीसीटीव्ही सोबत घेतले आहेत. हल्लेखोर जेवण घेण्यासाठी या ढाब्यावर थांबले असल्याचा संशय पोलिसांना आहे. सीसीटीव्हीत दिसणारी ही मुले खरोखरच हल्लेखोर असली तरी त्यांचा या हत्येत सहभाग आहे की नाही, याचा तपास आता होणार आहे.
सोमवारी दुपारी पंजाब पोलिसांनी पुन्हा एकदा ढाब्याच्या सीसीटीव्ही फुटेजची छाननी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत असताना पंजाब पोलिसांचे तांत्रिक पथकही हजर आहे. 29 मे रोजी ढाब्यावर सक्रिय असलेल्या सर्व मोबाईल फोनचा डंप डेटा काढला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले.
मानसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिद्धू मुसेवाला यांचे शवविच्छेदन थोड्याच वेळात केले जाणार आहे. मुसेवालाच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास होकार दिला आहे. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता.